पुणे (Pune): पुणे शहरातील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेला (PMC) रोज किमान ५०० टन डांबर मिश्रित खडीची आवश्यकता पडते. त्यासाठी हॉटमिक्स प्लांटमध्ये ‘एलडीओ’ नावाचे वंगण वापरून डांबर गरम केले जाते. यामुळे येरवडा परिसरात प्रचंड प्रदूषण होत असून, स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता पथ विभागाने हे डांबर एलपीजी वर गरम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रदूषण रोखले जाणार आहेच, पण खर्चात किमान २० टक्क्यांची बचत होणार आहे.
शहरात सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार, जलवाहिनी टाकणे या महापालिकेच्या कामांसह वीज कंपन्यांकडून भूमिगत विद्युत वाहिनी टाकणे, मोबाईल कंपन्यांकडून फायबर ऑप्टिकल्स केबल अन अन्य वाहिन्या टाकल्या जातात. तर ‘एमजीएनएल’कडून भूमिगत गॅस वाहिनी टाकली जाते. शहरातील सुमारे २०० किलोमीटर लांबीच्याच रस्त्यांना सेवा वाहिन्या टाकण्यासाठी डक्ट आहेत.
उर्वरित रस्त्यावर ही सुविधा नसल्याने रस्ते खोदण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहात नाही. त्यामुळे महापालिकेकडून दरवर्षी शेकडो किलोमीटरचे रस्ते खोदण्यास परवानगी दिली जाते. त्याबदल्यात रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रतिमीटर १२ हजार १९१ रुपये इतके शुल्क खासगी कंपन्यांकडून, तर शासकीय कंपन्यांना यात ५० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी किमान २००-३०० कोटी रुपयांची रक्कम जमा होते.
हे खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात गरम डांबरी मिश्रित खडीचा वापर करावा लागतो, तसेच शहराच्या अनेक भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करणे, खड्डे बुजविणे, पॅचवर्क करणे यासाठी डांबरी मिश्रित खडीचा वापर करावा लागतो. ही डांबर मिश्रित खडी येरवड्यातील हॉटमिक्स प्लांटमधून उपलब्ध करून दिली जाते.
एक टनासाठी साडेतीनशे रुपये खर्च
येरवडा येथे महापालिकेचा हॉटमिक्स प्लांट हा सुमारे चार एकर जागेमध्ये आहे. महापालिका खडी आणि डांबर येथे मिश्रित करते. चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करताना त्यासाठी हे मिश्रण योग्य पद्धतीने व पुरेशा प्रमाणात गरम होणे आवश्यक असते. डांबर गरम करण्यासाठी ‘एलडीओ’ नावाचे वंगण महापालिका प्रतिलिटर ५८ रुपये इतक्या दराने खरेदी करते.
एक टन माल तयार करण्यासाठी किमान सुमारे सहा मीटर ‘एलडीओ’ वंगणाची गरज पडते. म्हणजे साधारणपणे ५०० टन माल तयार करण्यासाठी सुमारे तीन हजार लिटर वंगण खर्ची पडते. यासाठी एका दिवसाला महापालिका सुमारे एक लाख ७८ हजार रुपये इतका खर्च डांबर गरम करून ते खडीत मिश्रित करण्यासाठी करत आहे.
पर्यावरण संवर्धन व खर्चात बचत
‘एलडीओ’चा वापर वंगण म्हणून केल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात धूर परिसरात पसरत आहे. या धुराचा दुर्गंधही निर्माण होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. धूर कमी व्हावा त्याचा त्रास रहिवाशांना हो नये यासाठी उपाययोजना केल्या असल्या तरी हा प्रश्न संपलेला नाही. त्यामुळे महापालिकेने या हॉटमिक्स प्लांटमध्ये एलपीजी गॅसचा वापर करून डांबर गरम करणे व खडी मिश्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
एलपीजी गॅसचा दर हा ६० रुपये किलो आहे. पण ‘एलडीओ’पेक्षा गॅसची ज्वलन क्षमता जास्त असल्याने कमी गॅसमध्ये जास्त डांबर गरम करणे व मिश्रण तयार करणे हे काम होणार आहे. त्यामुळे २० टक्के खर्च कमी होणार आहे, असे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
रस्ते दुरुस्ती व नवीन रस्ते तयार करण्यासाठी हॉटमिक्सचा वापर केला जातो. वंगण म्हणून ‘एलडीओ’चा वापर करण्याऐवजी एलपीजी गॅसचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खर्चात २० टक्के बचत होईल व त्यामुळे होणारे प्रदूषण १०० टक्के बंद होणार आहे. गॅस वापरता यावा यासाठी आवश्यक ते बदल केले जातील. त्यासाठी ५० लाखांचा खर्च येणार आहे.’’
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग
आकडे बोलतात
- पुणे शहरात २१०० किलोमीटर लांबीचे रस्ते
- त्यापैकी ७०० किलोमीटरचे रस्ते समाविष्ट ३२ गावांमध्ये
- उर्वरित १४०० किलोमीटर रस्त्यांपैकी सुमारे ४०० किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे
- १०० किलोमीटरचे रस्ते कच्चे
- ९०० किलोमीटरचे रस्ते डांबरी