
मुंबई (Mumbai): एका सामाजिक संस्थेच्या नावाखाली शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारा सरकारी तांदूळ थेट अफ्रिकेत पाठवून भ्रष्टाचार करणाऱ्यांचा भांडाफोड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी भ्रष्टाचाराचा दावा करत या प्रकरणात खुली चर्चा करण्याचे आव्हान सरकारला केले आहे.
सरकारतर्फे कोणीही जबाबदार माणसाने यावे आणि या 'भ्रष्टाचार पे चर्चा' करावी! जागा आणि वेळ तुम्हीच ठरवा! मुलांच्या तोंडचा सरकारी तांदूळ थेट आफ्रिकेत कोण पोचवतंय, पाहू हे सरकारला ज्ञात आहे का? पहा हा भ्रष्टाचाराचा नवा फंडा, असे ट्विट करत अंबादास दानवे यांनी जे.वी.ग्रेन्स डीलर्स या नोंदणीकृत सामाजिक संस्थेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात त्यांनी अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून याप्रकरणी चौकशी आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
डीपीईएमएस (DPEMS) विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने ट्रस्टचे अध्यक्ष अनिलकुमार गुप्ता शालेय विद्यार्थ्यांसाठी वाटप होणारा तांदूळ परदेशात, विशेषतः आफ्रिकन देशांमध्ये तस्करी करतात, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
जे. वी. ग्रेन्स डीलर्स ही नोंदणीकृत संस्था सामाजिक कार्यासाठी नोंदवली गेली. मात्र, या संस्थेला मुंबई जिल्ह्यातील तांदूळ वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले. या संस्थेचे अनिलकुमार गुप्ता यांची संस्थेबाबत वृत्ती 'वरून सज्जन, आतून चोर' अशीच आहे. संस्थेला होणारा नफा सामाजिक उपक्रमासाठी वापरण्याऐवजी तो हे महाशय स्वतःच्या फायद्यासाठी वापरात असल्याचे समोर आले आहे. हे ऑडिटच्या शेअर होल्डींगच्या नमुन्यातून सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट झाले आहे. यांचे कारनामे पहा, असे म्हणत अंबादास दानवे यांनी या संस्थेच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.
संस्थेत 80 टक्के शेअरहोल्डर असलेले अनिलकुमार गुप्ता हेच महाशय तांदूळ वाहतुकीचे उपकंत्राटदार आहेत. यांना हे उपकंत्राट देताना नियम जात्यात दळून टाकले गेले आहेत. एवढ्यावर हे थांबत नाही. या उपक्रमांतून येणारा नफा हा थेट अनिलकुमार गुप्ता यांच्या खात्यात वळवला जात आहे.
गुप्ता हेच पुरवठ्यासाठी आवश्यक वाहनांचे मालक आहेत, जी संस्थेच्या पैशातून खरेदी करण्यात आली आहेत. तसेच संस्थेला आलेला निधी हा 'अनसिक्योर्ड लोन' म्हणून धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता अनिलकुमार गुप्ता यांनी स्वतःच्या खात्यात वळवला आहे. संस्थेला घरगड्यासारखे वागवल्याचा हा पुरावा, असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
कमी भावाने हे कंत्राटदार महाशय मुंबईच्या भागात अन्नधान्याची ने - आण करतात. मग उरलेले पैसे येतात कोणाकडून. ही सेवा स्वस्तात देऊन 'प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजना' अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी येणारा तांदूळ काळ्या बाजारात तर पळवला जात नाही? हे महाशय गुप्ता, शालेय मुलांसाठी येणारा तांदूळ परदेशात विशेषतः आफ्रिकन देशात नेण्यासाठी यांनी जाळे उभे केल्याची माझी खात्रीलायक माहिती आहे, असा दावाही दानवे यांनी केला आहे.
जे. बी. ग्रेन डीलर्सच्या वतीने कोणतेही सामाजिक काम झालेले नाही. 5-10-2023 रोजी रेल्वे प्रशासनाने यांचे एक कंत्राट मुदतीपूर्वीच रद्द केले आणि डिपॉझिटसुद्धा जप्त केले आहे. अशा या संस्थेला आणि लोकांना कोणतेही टेंडर देता येत नाही. मग गुप्ता हे महायुती सरकारचे लाडके लाभार्थी कसे? या प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करून संस्थेची नोंदणी रद्द करण्यात यावी. या टेंडर घोटाळ्यात दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.