पुणे (Pune) : पुण्यात वाढत्या रिक्षांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आता रिक्षा थांब्याची संख्यादेखील वाढवली जाणार आहे. (Good News For Punekar)
पुण्यात २०१० मध्ये रिक्षांची संख्या ४५ हजार इतकी होती. त्यावेळी ९२२ थांबे होते. सध्या पुणे आरटीओत नोंद असलेल्या रिक्षांची संख्या एक लाख ३० हजार इतकी आहे. मात्र, थांब्यांमध्ये केवळ २८ एवढीच वाढ झाली आहे. एक लाख ३० हजार रिक्षा अन् थांबे ९५० अशी पुण्यातील स्थिती आहे. थांबे नसल्याने रिक्षा रस्त्यावर कशाही लावण्यात येतात. त्याचा फटका वाहतुकीला बसतो.
हे लक्षात घेता प्रशासनाने रिक्षा थांबा संदर्भात सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला. त्यानुसार आता पुणे आरटीओ, वाहतूक पोलिस, पुणे महापालिका व रिक्षा संघटना एकत्रित येऊन थांबा संदर्भात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे.
पाच वर्षांत नवीन थांबा नाही
पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने १५ जानेवारी २०२० मध्ये २८ थांब्यांना मंजुरी दिली. त्यानंतर अद्याप एकाही थांब्यास परवानगी मिळालेली नाही. थांब्यांबाबतचा निर्णय वाहतूक पोलिसांना घ्यायचा असतो. मात्र, पाच वर्षांत थांब्यास परवानगी मिळालेली नाही.
पुणे आरटीओ प्रशासनाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत रिक्षा थांब्यांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याला प्राधिकरणाच्या अध्यक्षांनीदेखील मंजुरी दिली आहे.
महत्त्वाचे
- रिक्षाचे परवाने खुले झाल्यानंतर संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ
- काही वर्षांत पुणे शहरात मोठ्या प्रमाणात बदल
- वाहतुकीस अडथळा ठरणारे थांबे हटविण्यात आले
- व्यावसायिक इमारती उभ्या राहात असताना तेथूनही थांबे काढले
- याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे
- आता थांब्यांची संख्या वाढविण्यासाठी जागेचा सर्व्हे करण्यास सुरुवात
- जिथे नवीन थांबा सुरू करणे आवश्यक आहे तिथे केले जातील
- जिथे आवश्यकता नाही अथवा वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या जागेतील थांबे हटविले जातील
रिक्षा थांब्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांनीदेखील प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. रिक्षा थांब्यांची संख्या तुलनेने कमी असल्याने प्रवाशांना फटका बसत आहे.
- नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत, पुणे
रिक्षा थांब्यांसदंर्भात जागेची निश्चिती करण्यासाठी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. आरटीओच्या २० निरीक्षकांचा समावेश आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल सादर होईल. त्यानंतरच थांबे वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी थांबे तयार केले जातील.
- स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे