
पुणे (Pune) : येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल आणि समतल विलगकाचे (ग्रेड सेपरेटर) काम करण्यास नाल्याचा अडथळा ठरत आहे. त्यामुळे नाला काही प्रमाणात वळविण्याच्या कामास महापालिकेने सुरुवात केली आहे.
नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाने उड्डाणपूल व समतल विलगक करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने आवश्यक परवानगी दिल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला वेग आला.
आराखडे, माती परिक्षण व अन्य तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. उड्डाणपूल व समतल विलगकाचे काम सुरू करण्यासाठी वाहतूक पोलिस शाखेकडे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी अर्जही दाखल केला.
दरम्यान, खोदाईचे काम सुरू झाल्यानंतर वाहतूक सुरळीत कशी राहील, वाहने कसे वळविण्यात येतील, वाहनांची संख्या, गर्दी टाळण्यासाठीच्या उपाययोजना व वाहतुकीत बदल केल्यानंतर प्रत्यक्षात कशी स्थिती राहील? याबाबतचे सादरीकरणही वाहतूक शाखेकडे करण्यात येईल.
या कामाच्या जवळून नाला जात असल्याने अडथळा ठरत आहे. त्यामुळे विशेष प्रकल्प विभागाने नाला वळविण्याचे काम हाती घेतले आहे. मागील आठवड्यात या कामाला सुरुवात झाली. हे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर उड्डाणपूल व समतल विलगकाच्या कामाला सुरुवात होईल. मात्र, वाहतूक शाखेची परवानगी मिळाल्यानंतर काम सुरू होणार आहे. त्यामुळे उड्डाणपूल व समतल विलगकासाठी खोदाईच्या कामाला आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे.
नाल्याचे काम पूर्ण झाल्यावर आणि वाहतूक पोलिस शाखेची परवानगी मिळाल्यानंतर खोदाईच्या कामाला सुरुवात केली जाईल.
- अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प विभाग, महापालिका