Pune City
Pune City Tendernama
पुणे

Pune: 'या' प्रकल्पांमुळे 5 वर्षांत होणार क्रांतिकारी बदल; कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : येत्या पाच वर्षांत पुण्याचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. त्यातून राज्याचेच नव्हे तर, देशातील एक महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ (Growth Engine) म्हणून पुण्याची (Pune City) नवी ओळख निर्माण होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर, राज्यातील एक प्रमुख शहर असलेल्या पुण्याने (Pune City) विकासाची कास आता धरली आहे. त्यासाठी शहर आणि परिसरात दोन प्रकारचे रिंग रोड (Ring Road), आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airport), पुणे-मुंबई दरम्यान हायस्पीड रेल्वे (Highspeed Railway), वाघोलीजवळ बहुमजली उड्डाण पूल आदी बहुविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प साकारत आहेत.

वेगाने वाढणारे शहर

महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. उत्कृष्ट हवामान, मुबलक पाणी, सुलभ दळणवळण आणि मुबलक कुशल मनुष्यबळ आदींमुळे शहर व परिसराकडे देशातूनच नव्हे तर जगभरातील उद्योजकांचा ओढा वाढत आहे. शहर आणि परिसराची लोकसंख्या ७५ लाखांहून जास्त झाल्यामुळे शहराचा भौगोलिक विस्तारही होत आहे. त्यामुळेच राज्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले हे शहर ठरले आहे.

या शहराच्या विकासाला आणखी गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांचे मेट्रो, आयटी पार्कचे विस्तारीकरण, द्रुतगती मार्गाचे सक्षमीकरण, रेल्वे बहुपदरी मार्ग आदी अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी निधीची तरतूद, भूसंपादन, प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. त्यात येत असलेल्या अडथळ्यांवर मातही करण्यात येत आहेत.

पुणे टाकणार अर्थव्यवस्थेत भर

पायाभूत सुविधांचे जाळे भक्कम झाल्यावर शहरातील उद्योग, उत्पादन आणि सेवा क्षेत्र आणखी बहरणार असून त्यातून रोजगाराला चालना मिळाल्यावर शहरातील क्रयशक्तीची वाढ होणार आहे. परिणामी, शहरातील नागरिकांचे राहणीमान उंचावतानाच अर्थव्यवस्थेतही पुणे मोलाची भर टाकणार आहे. याचवेळी शहराचे पर्यावरण चांगले राहण्यासाठी नदीकाठ संवर्धन, जायका आदी प्रकल्पांसाठीही प्रक्रिया सुरू झाली आहे. एकंदरीतच या प्रकल्पांतून येत्या चार-पाच वर्षांत जगाला नव्या पुण्याची ओळख होणार आहे.

काही प्रमुख प्रकल्प.....

- पुरंदरचे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ

- ‘पीएमआरडीए’चा रिंगरोड

- पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग

- मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर

- नगर रस्त्यावर उड्डाणपूल

पुणे शहर आणि परिसराची क्षमता मोठी आहे. पुरंदर विमानतळ, रिंगरोड, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे असे अनेक प्रकल्प हे शहर व परिसराच्या विकासाला आणखी गती देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. उशिरा का होईना, यापैकी अनेक प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. परंतु या कामाने वेग घेतलेला नाही. हे प्रकल्प वेळेत मार्गी लावले पाहिजे.

- सतीश मगर, अध्यक्ष, क्रेडाई नॅशनल

जागतिक दर्जाचे शहर म्हणून पुणे शहराची वाटचाल वेगाने सुरू आहे. मात्र सर्व सोयी-सुविधा असून देखील या शहराला २४ तास नागरी वाहतूक विमानतळ नसल्यामुळे काही मर्यादा येत आहेत. पुणे हे पश्‍चिम महाराष्ट्रातील शेती, औषधे आणि औद्यागिकदृष्टया एक हब आहे. त्यासाठी कार्गो सक्षम करण्याची गरज आहे. स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ पुण्याच्या विकासासाठी गरजेचे आहे.

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

औद्यागिक, माहिती-तंत्रज्ञान, शैक्षणिक आणि संशोधन या क्षेत्रात देशात वेगाने विकसित होणारे आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणारे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. चांगल्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा भक्कम झाल्या तर आगामी काळात मेडिकल टुरिझम, परदेशी विद्यापीठे शहरात येण्याचे प्रमाण आणखी वाढेल.

- सुधीर मेहता, माजी अध्यक्ष, एमसीसीआयए