असे काय झाले की त्याने मिळालेली सरकारी नोकरी नाकारली!
पुणे (Pune) : पुणे महापालिकेत (PMC) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची भरती करताना अनुभवाचा पुरावा म्हणून कॅश व्हाउचर ग्राह्य धरल्याने त्यावर उमेदवारांनी आक्षेप घेत अशी निवड रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाने यावर खुलासा करत कॅश व्हाउचरसह इतर पूरक कागदपत्रे तपासली असून, त्यांचा अनुभव सिद्ध होतो. मात्र ही कागदपत्रे बनावट असल्याचे पुढे सिद्ध झाले, तर संबंधितांवर फौजदारी कारवाई होईल, असे स्पष्ट केले.
पुणे महापालिकेने नुकतीच ४४८ जागांची नोकर भरती प्रक्रिया पूर्ण केली. यात लिपिक, कनिष्ठ अभियंता, सहायक विधी अधिकारी, सहायक अतिक्रमण अधिकारी या पदांचा समावेश आहे. सरळसेवा भरती असल्याने ‘आयबीपीएस’ संस्थेने ऑनलाइन परीक्षा घेतली. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर केली आहे. अनुभव सिद्ध करता यावा यासाठी उमेदवारांनी अनुभव प्रमाणपत्रासाठी जुगाड सुरू केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
एकीकडे बनावट कागदपत्रांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कागदपत्र पडताळणीत एका उमेदवाराने शारीरिक व कौटुंबिक कारण देऊन नोकरी नाकारली आहे, प्रशासनानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदासाठी गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना गुणांनुसार प्राधान्य क्रमाने कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविण्यात आले. त्यातून १३५ जागांसाठी अंतिम निवड यादी जाहीर केली. पण यात अनेक उमेदवारांनी पगाराचा पुरावा म्हणून कॅश व्हाउचर दिले आणि ते ग्राह्य धरले आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या या ११ पुराव्यांमध्ये त्याचा समावेश नव्हता, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांकडे ११ कागदपत्रांपैकी बहुतांश कागदपत्रे असूनही त्यांचा विचार केला नाही. हे कॅश व्हाउचर बनावट असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे, तर महापालिका प्रशासनाने कॅश व्हाउचरसह बँक स्टेटमेंट, फार्म १६ सह इतर कागदपत्रे तपासून निवड केली आहे, कागदपत्रे बनावट असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित उमेदवारांवर गुन्हा दाखल केला जाईल, त्याला नोकरीवरून काढून टाकू, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
अनेक उमेदवारांनी बांधकाम व्यावसायिक, ठेकेदाराकडून कॅश व्हाउचर, अनुभव प्रमाणपत्रे घेतली आहेत. त्यामुळे आमच्याकडे सर्व अधिकृत कागदपत्रे असूनही अंतिम निवड यादीत स्थान नाही. ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याने न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
- एक उमेदवार
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी मी प्रतीक्षा यादीत आहे. पण अनेक उमेदवारांनी बनावट अनुभव दाखले दिले आहेत. त्यात कॅश व्हाउचर महापालिकेने ग्राह्य धरले आहे, यावर माझा आक्षेप आहे. त्यामुळे आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून महापालिकेविरोधात तक्रार दिली आहे.
- कुणाल भदाणे, उमेदवार
उमेदवाराकडून केवळ कॅश व्हाउचर नाही तर शपथपत्र, कंपनीचे पत्र, फॉर्म १६ यासह इतर पुरावे घेतले आहेत. हुशार उमेदवारावर अन्याय होऊ नये, यासाठी कॅश व्हाउचर स्वीकारण्यात आले. तरीही कोणी बनावट कागदपत्रे असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास आणि ते सिद्ध झाल्यास आम्ही संबंधिताला नोकरीवरून काढू व फौजदारी गुन्हाही दाखल करू.
- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका