Aurangabad : 400 वर्षांपूर्वी 'येथे' असे व्हायचे स्वागत अन् आता..

भुखंड देऊन त्यावर घरे बांधून देण्याचे आश्वासन पाळले नसल्याने
Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : जुन्या शहरातील किलेअर्क परिसरातील नौबत दरवाजा ते पंचकुआ कब्रस्थान या रस्ता बांधणीसाठी रुंदीकरण मोहिमेस २१ जानेवारी २०२२ अर्थात १२ महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. यासाठी अनेक घरांची अतिक्रमणे काढण्यात आली होती. मात्र, येथील शंभर फुटी रस्त्याचे काम मनपाच्या वतीने अद्याप हाती घेण्यात आले नाही. आधी या रस्त्याच्या कामात अतिक्रमणांमुळे मोठ्याप्रमाणावर अडथळा निर्माण होत असल्याचे कारण मनपा कारभारी पुढे करत. नागरिकांचा विरोध मोडून अतिक्रमण काढत कारवाई पूर्ण केली आहे. मात्र, अद्याप रस्त्याचे काम रखडले आहे. यासंदर्भात स्पाॅट पंचनामा करीत असताना प्रतिनिधीने आसपासच्या रहिवाशांना विचारले असता शंभर फुटी रस्त्यासाठी आमची कष्टाची घरे पाडण्याआधी मनपा प्रशासनाने आम्हाला आमखास मैदानामागे किंवा स्मार्ट सिटी कार्यालयाच्या माघे भुखंड देऊन त्यावर घरे बांधून देण्याचे आश्वासन पाळले नसल्याने आम्हीच रस्त्याचे काम अडवल्याचे रहिवाशांनी सांगितले.

औरंगाबादेतील जुन्या शहरातील व्हीआयपी रस्ता ते सिटीचौकाला जोडणाऱ्या नौबत दरवाजा ते सिटीचौक या रस्त्यासाठी सरकारने दिलेल्या १५० कोटींतून तीन कोटी १७ लाख ९७१ रूपये मंजूर करण्यात आले होते. २३ ऑक्टोबर २०२० रोजी याकामाचे कंत्राट राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत लक्ष्मी कंन्सट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून मार्गावरील एका मोठ्या पुलाचे काम देखील करण्यात आले. पुढे निधीची कमतरता आणि अतिक्रमणाचा विळखा असल्याने पुढे पंचकुआ कब्रस्थानापर्यंत आठशे मीटर रस्त्याचे काम गेल्या बारा महिन्यांपासून रखडले. दरम्यान मनपाने रस्त्याला अडथळा येत असलेले अतिक्रमण काढले पण अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे देण्याचे आश्वासनपूर्ती मनपाकडून होत नसल्याने या रसत्याचे काम कधी पूर्ण होईल याची शक्यता नाही. परिणामी अतिक्रमणधारक आणि मनपा कारभाऱ्यांच्या वादात वाहनचालक, नागरिकांची गैरसोय होत आहे.

रस्ता करायचा नव्हता तर, आमची घरे पाडलीच कशाला, आम्हाला पर्यायी घरांचे स्वप्न दाखवलेच कशाला, कब्रस्थानची जागा ताब्यात घेतली कशाला, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे. व्हीआयपी रोड ते सिटीचौक मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी नागरिकांना हाच एकमेव मुख्य रस्ता आहे. चारशे वर्षांपूर्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या खास व्यक्तींच्या स्वागतासाठी याच मार्गावर किलेअर्क भागात पंचकुवा कब्रस्थानच्या पुढे नौबत दरवाजाचे बांधकाम झाले होते. याला दोन्ही बाजूने मोठी तटबंदी होती. खास व्यक्तींचा दरवाजात आगमन होताच नौबती वाजवून त्यांचे स्वागत केले जायचे. इसवी सन १६६३ पासूनच्या या ऐतिहासिक ठेव्याच्या आत-बाहेर पडताना आता औरंगाबादकरांचे खड्डयांनी स्वागत होत असल्याने त्रस्त झाले आहेत. व्हीआयपी रस्त्याकडून नौबत दरवाजा मार्गे पंचकुआ कब्रस्थानकडे जाताना या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

नवीन शंभर फुटाचा रस्ता होणार, नौबत दरवाजातून वाहतूक कोंडी कमी होणार म्हणून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण, अडथळा ठरणारे अतिक्रमण काढल्यानंंतर देखील या रस्त्याच्या पुढील कामाला सुरुवात झाली नाही. मोठमोठ्या भगदाडात पाणी साचल्याने खोल खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. काही कार आणि दूचाकीधारक खड्यात पडल्यामुळे जीवघेणे अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले. मध्यवर्ती बाजारपेठेत या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वावर तसेच कब्रस्थान असल्याने  वर्दळ मोठ्या प्रमाणाव असून, अरुंद रस्ता आणि वाहनांची होणारी गर्दी यामुळे या भागात जुनी  समस्या कायम आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com