PCMC Tendernama
पुणे

PCMC : पिंपरी-चिंचवडमधील 'त्या' रस्त्यांना का लागले अतिक्रमणांचे ग्रहण?

Pimpri : अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्सनुसार महापालिकेने विकसित केलेल्या रस्त्यांचे सौंदर्य वाढलेले आहे. मात्र, त्यावर काही नागरिकांनी अतिक्रमणे केलेली आहेत.

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : महापालिकेच्या माध्यमातून महामार्गांसह अंतर्गत भागात शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) रस्ते विकसित केले जात आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. मात्र, काही नागरिकांच्या आडमुठेपणामुळे अतिक्रमणांचे ग्रहण रस्त्यांना लागत आहे. यामध्ये वाहनचालकांसह दुकानदार, पथविक्रेत्यांच्या बेशिस्तीचा कहर झालेला असल्याचे चित्र शहरात आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे सौदागर भागातील रस्ते विकसित केले आहेत. त्यांच्या बाजूला प्रशस्त पदपथ, सायकल ट्रॅक, वाहने उभी करण्याची सुविधा आहे. अंतर्गत रस्तेही कॉंक्रिटची झाली आहेत. २०१७ पासून आतापर्यंत या भागाचा कायापालट झाला आहे.

रस्त्याच्या कडेला बाग विकसित केल्याने सौंदर्यात आणखी भर पडली आहे. अशाच स्वरूपाचे शहराच्या अन्य भागातील रस्ते अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्सनुसार महापालिका विकसित करत आहे.

यामध्ये महामार्गासह मोठ्या रस्त्यांचा मुख्य मार्ग, सेवा रस्ता, वाहनतळ, सायकल ट्रॅक, पदपथ असे नियोजन आहे. अन्य छोट्या रस्त्यांचाही कायापालट झाला आहे. काही रस्त्यांची कामे अद्याप सुरू आहेत.

पदपथांवर दुकाने, वाहने

अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्सनुसार महापालिकेने विकसित केलेल्या रस्त्यांचे सौंदर्य वाढलेले आहे. मात्र, त्यावर काही नागरिकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. यामध्ये रस्त्याच्या कडेचे दुकानदार व व्यावसायिकांनी साहित्य विक्रीसाठी पदपथांवर ठेवलेले असते. काहींनी दुकानांसमोरची जागा अन्य पथारीवाल्यांना वा विक्रेत्यांना भाडेतत्त्वाने दिलेली असते.

त्यामुळे पथारीवाले, हातगाडीवाले सर्रासपणे पदपथांवर बसलेले असतात. अनेक भागात भाजीविक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची ठेले पदपथांवर लावलेले असतात. काही ठिकाणी वाहनेही उभी केलेली असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथांऐवजी धोका पत्करून रस्त्यांवरून चालावे लागते.

प्रत्यक्ष आढळलेले चित्र

- जाधववाडी येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संरक्षण भिंतीलगतच्या पदपथ व रस्त्यावर भाजीपाला व विविध वस्तू विक्रेत्यांची दुकाने

- रावेत येथील भोंडवे कॉर्नर परिसरातील दुकानदारांनी पदपथावर साहित्य विक्रीसाठी ठेवलेले होते, काहींनी दुचाकींसह अन्य वाहनेही उभी केली होती

- जाधववाडीतील शिवछत्रपती चौकापासून अंतर्गत रस्त्यांच्या पदपथांवर दोन्ही बाजूला सोसायट्यांमधील मोटारी व अन्य वाहने उभी होती

- केएसबी चौक ते पूर्णानगर चौक रस्त्याच्या पदपथांवर चारचारी मोटारी उभ्या होत्या, रस्त्याच्या कडेला फळे विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली होती

- संतोषी माता चौक ते यशवंतनगर रस्ता, संतोषी माता चौक ते हॉकी स्टेडिअम रस्त्यावर हातगाडीवाल्यांसह दुचाकी व चारचाकी वाहने उभी होती

- पिंपळे गुरव काटेपूरम चौक आणि नवी सांगवीतील साई चौक, कृष्णा चौक रस्त्यांच्या कडेला विविध वस्तू व पदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती

- सांगवी फाटा ते रक्षक चौक दरम्यान बीआरटी रस्त्याच्या सेवारस्त्यालगत व पदपथांवर फळे, भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले आढळले

महापालिकेने विकसित केलेल्या रस्त्यांवर अतिक्रमणे होत आहेत. ते न रोखल्यास रस्ते आणि पदपथांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाणार आहे. महापालिकेच्या हेतुलाच हरताळ फासला जात आहे.

- श्रेया सानप, विद्यार्थिनी, रावेत

रस्ते व पदपथ चांगले होत आहेत पण, त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. काही रस्ते खूपच छोटे होऊन पदपथ मोठे केले आहेत. त्यामुळे हातगाडी, पथारीवाले अतिक्रमण करत आहेत.

- एकनाथ मांडे, नोकरदार, मोशी