
पुणे (Pune) : हवाई दलाची तेरा एकर जागा फेब्रुवारीत पुणे विमानतळ प्राधिकरणाला मिळणार आहे. विमानतळ प्राधिकरणाने याचा आराखडा तयार केला आहे. यात नवीन मालवाहू टर्मिनल, नादुरुस्त विमान ठेवण्याची जागा (रिमोट बे) तयार केली जाणार आहे, तर ‘पार्किंग बे’ची संख्या पाचने वाढवली जाणार आहे. शिवाय ‘ऍपरन’ (विमानतळावरील एक निश्चित क्षेत्र जेथे विमाने पार्किंग केली जातात, सामान चढविणे किंवा उतरविणे, इंधन भरणे) क्षेत्राचादेखील विस्तार केला जाणार आहे. यामुळे नजीकच्या काळात पुणे विमानतळावरून विमानांची वाहतूक वाढेल.
संरक्षण विभागाने पुणे विमानतळाला तेरा एकर जागा देण्यास यापूर्वीच तत्त्वतः मंजुरी दिली. तत्पूर्वी विमानतळ प्रशासनाने संरक्षण दलाच्या मागणीनुसार ‘बीएसओ’ व ‘सीडब्लूई’ ही दोन कार्यालये बांधण्याचे काम हाती घेतले आहे. याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. एक ते दीड महिन्यात हे काम पूर्ण होईल, असा अंदाज विमानतळ प्रशासनाने व्यक्त केला आहे. हे कार्यालय बांधून झाल्यावर संरक्षण दलाकडून तेरा एकर जागा विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात दिले जाईल. या जागेत प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील. कार्गो टर्मिनलसाठी सुमारे पाच एकर जागेचा वापर होणार आहे.
पाच नवीन पार्किंग बे
पुणे विमानतळावर सध्या दहा ‘पार्किंग बे’ असून, आणखी पाच ‘पार्किंग बे’ झाल्यानंतर विमानांच्या उड्डाणांच्या संख्येत वाढ होईल. शिवाय हे ‘पार्किंग बे’ मोठ्या विमानांच्या दृष्टीने तयार केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात जेव्हा धावपट्टीची लांबी वाढेल, त्यावेळी या ‘पार्किंग बे’मुळे ‘ड्रीमलायनर’सारखी मोठी विमाने पुणे विमानतळावरून झेपावतील. तसेच ‘रिमोट बे’देखील तयार केले जाणार असल्याने नादुरुस्त विमान ‘पार्किंग बे’मध्ये ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही. पुणे विमानतळ प्रशासनाने तीन ‘रिमोट बे’चा प्रस्ताव दिला आहे.
‘पार्किंग बे’ची संख्या वाढल्याने...
विमानांची वाहतूक वाढविण्यासाठी ‘पार्किंग बे’ची संख्या जास्त असणे गरजेचे आहे. सध्या पुणे विमानतळावर दहा ‘पार्किंग बे’ आहे. उड्डाणांची संख्या दिवसाला सरासरी ९७ इतकी आहे. ‘पार्किंग बे’ची संख्या वाढल्यावर विमानतळाची विमान सामावून घेण्याची क्षमता वाढणार आहे. सध्याच्या तुलनेत सुमारे २० ते ३० विमानांची संख्या वाढू शकते. विमानांची संख्या वाढल्याने प्रवाशांच्या संख्येतदेखील वाढ होईल.
हवाई दलाकडून तेरा एकर जागेस मंजुरी मिळाली आहे. सध्या त्या जागेवर असणारे कार्यालयाचे स्थलांतर झाले आहे. नव्या कार्यालयाचे बांधकाम सुरू असून, ते पूर्ण होताच हवाई दल विमानतळ प्रशासनाला जागा हस्तांतर करणार आहे. त्यानंतरच ‘पार्किंग बे’ व ‘रिमोट बे’ बांधण्याचे काम होईल.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे