
मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा-भाईंदर प्रकल्पाला लवकरच गती मिळणार आहे. या कामाला नुकतीच सीआरझेडची मंजुरी मिळाली आहे. नरीमन पॉईंट ते विरार हा प्रवास रस्तेमार्गे करायचा झाल्यास साडेतीन तासांचा अवधी लागतो. कोस्टल रोडमुळे हे अंतर 65 किलोमीटरवर येईल. तसेच दक्षिण मुंबईतून विरारला अवघ्या 40 मिनिटांत पोहोचता येणार आहे.
वर्सोवा ते दहिसर या 18.47 किलोमीटरच्या कोस्टल रोडसाठी महापालिकेने कंत्राटदार निश्चित केल्यानंतर आता या प्रकल्पाला सागरी व्यवस्थापन क्षेत्र व राज्याची परवानगी मिळाली आहे. वन विभागासारख्या काही महत्त्वाच्या परवानग्या अद्याप बाकी असल्या तरी सीआरझेड परवानगीमुळे या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे काम चार वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो.
दक्षिण मुंबईतून थेट भाईंदरपर्यंत जाण्यासाठी सहा टप्प्यात वर्सोवा-दहिसर-भाईंदरदरम्यान कोस्टल रोडची बांधणी करण्यात येणार आहे. त्यानुसार, मरिन लाईन्स ते वरळीदरम्यान कोस्टल रोड प्रकल्पाचे काम ऑक्टोबर 2018मध्ये महापालिकेने हाती घेतले होते. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे. वर्सोवा-दहिसर प्रकल्प गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतून थेट भाईंदरपर्यंत जाण्यासाठी ६ टप्प्यात वर्सोवा-दहिसर-भाईंदर कोस्टल रोडची बांधणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या वर्सोवा ते बांगूर-नगर, बांगूरनगर ते माईंडस्पेस मालाड आणि जीएमएलआर, चारकोप ते गोराई आणि दुसरा टप्पा गोराई ते दहिसर आणि तिसरा टप्पा दहिसर ते भाईंदर असा असणार आहे.