
सोलापूर (Solapur) : मकरसंक्रातीला भरविण्यात येणारी श्री सिद्धश्वरामेश्वरांची गड्डा यात्रा भरविण्यासाठी होम मैदानाची निविदा काढली आहे. व्यापाऱ्यांच्या तक्रारी नको म्हणून प्रथमच निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याची माहिती मंदिर समितीच्यावतीने देण्यात आली.
जानेवारी महिन्यात होणाऱ्या श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेसाठी महापालिका १५ डिसेंबर ते ३१ जानेवारी या दीड महिन्याच्या कालावधीत होममैदान मंदिर समितीच्या ताब्यात देते. यंदाही हे मैदान ताब्यात देण्यासाठी मंदिर समितीने महापालिकेला पत्र दिले आहे.
डिसेंबर महिनाअखेरपासूनच होम मैदानावर गड्डा यात्रा भरण्यास सुरवात होते. ही यात्रा २६ जानेवारीपर्यंत असते.
होम मैदान देण्यासाठी सिद्धेश्वर देवस्थान समितीने यंदा पहिल्यांदाच टेंडर पद्धत अवलंबली आहे. गतवर्षी एका स्थानिक मक्तेदाराने लिलाव अथवा टेंडर पद्धतीने मैदान देण्याची मागणी केली होती. ज्या मक्तेदाराला मंदिर समितीने मैदान दिले होते, त्याच्यापेक्षा अधिक रक्कम देण्यास तयार असूनही मैदान मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला होता.
ही तक्रार धर्मादाय उपायुक्तांपर्यंत गेले होते. या तक्रारीनंतर पुण्याच्या सहआयुक्तांनी टेंडर पद्धत अवलंबण्याचा आदेश काढला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी करत मंदिर समितीने यंदा मैदान देण्यासाठी टेंडर जाहीर केले आहे.