MIDC Tendernama
पुणे

MIDC : तळेगावमधील वाहतूक कोंडी सुटणार; एमआयडीसीने दिली गुड न्यूज

Traffic Jam : सुमारे चार हजारांपेक्षा अधिक मालवाहतूक करणारी वाहने शहरातून जातात. ही संख्या अधिक असल्‍याने शहरात वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pmpri) : वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी ‘एमआयडीसी’कडून (MIDC) सुसज्‍ज ट्रक टर्मिनल (Truck Terminal) उभारण्यात येत आहे. दोन ठिकाणी टप्‍पा क्रमांक एक आणि टप्‍पा क्रमांक दोन असे काम सुरू आहे.

५५० ट्रक उभे राहण्याची क्षमता असलेल्‍या या टर्मिनलचे काम दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्‍यासाठी सुमारे १९ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्‍यामुळे तळेगाव ‘एमआयडीसी’ हद्दीतील वाहतूक कोंडीचा प्रश्‍नदेखील सुटला जाणार आहे. तर टेंडरसह इतर प्रक्रिया राबविण्याचे काम पाहता टर्मिनल सुरू होण्यासाठी एकूण चार महिन्‍यांचा कालावधी जाणार आहे.

तळेगाव, चाकण, पिंपरी, रांजणगाव येथे एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. येथे वाहननिर्मिती उद्योगांसह अनेक छोटे-मध्यम उद्योग आहेत. या उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल तसेच तयार माल घेऊन येणारे वाहतुकीचे ट्रक, कंटेनर, ट्रेलरद्वारे रस्‍त्‍याच्‍या कडेला उभे केले जातात. पार्किंगसाठी जागा नसल्‍याने रस्‍त्‍याकडेला ट्रक उभे करण्याची वेळ येत आहे.

सुमारे चार हजारांपेक्षा अधिक मालवाहतूक करणारी वाहने शहरातून जातात. ही संख्या अधिक असल्‍याने शहरात वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ही समस्‍या सोडविण्यासाठी ‘एमआयडीसी’ने ट्रक टर्मिनल उभारण्याच्‍या कामाला गती दिली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव ‘एमआयडीसी’मध्ये पुष्प संरक्षण केंद्राजवळ नानोली येथे १० हजार चौरस मीटर क्षेत्रात एक ट्रक टर्मिनल, तर बधालेवाडी-मिंडेवाडी ७५ मीटर रस्त्यालगत ४० हजार चौरस मीटर क्षेत्रात दुसरे ट्रक टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही ट्रक टर्मिनलचे काम गेल्या वर्षी सुरू झाले होते आणि सध्या अंतिम टप्प्यात आहे.

वाहन चालकांसाठी आरामगृहे, स्वच्छतागृहे, कॅफेटेरिया, वाहन पार्किंग सुविधा तसेच वाहन दुरुस्ती व मेंटेनन्ससाठी दुकाने उभारण्यात येत आहेत. तळेगाव ‘एमआयडीसी’मधील या दोन्ही टर्मिनल्सवर डांबरीकरण आणि इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. काम पूर्ण झाल्यानंतर टर्मिनलच्या संचालनासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाईल.

नियोजित टर्मिनलचे काम...

एकूण क्षेत्रफळ - वाहने पार्किंग क्षमता - दुकानांची संख्या - विश्रांतीगृह - एकूण खर्च

पहिला टप्‍पा - १० हजार चौरस मीटर - २०० ट्रक - ८ - १०० वाहनचालकांसाठी - ४ कोटी रुपये

दुसरा टप्‍पा - ४० हजार चौरस मीटर - ३५० ट्रक - १२ - २०० वाहन चालकांसाठी - १५ कोटी रुपये.

जागेची प्रतिक्षा

पिंपरी-चिंचवड शहरातही ट्रक टर्मिनलसाठी काही जागा आरक्षित करण्यात आल्‍या होत्‍या. टी ब्‍लॉक, एफ २ ब्‍लॉक या ठिकाणी ट्रक टर्मिनल उभारण्याचे नियोजन होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे अद्याप त्‍यावर कार्यवाही झाली नाही. काही नियोजित जागांवर व्‍यावसायिक गाळे उभे राहिल्‍याचेदेखील चित्र आहे. परिणामी शहरातील एमआयडीसी रस्‍त्‍याकडेला अनेक ठिकाणी वाहने उभी केली जातात. त्‍यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते.

तळेगाव एमआयडीसीत टप्‍पा क्रमांक एक आणि टप्‍पा क्रमांक दोनचे काम अंतिम टप्‍प्‍यात आहेत. सध्या प्‍लॅस्‍टर आणि स्‍लॅबचे काम सुरू आहे. दोन महिन्यांत ते काम पूर्ण होईल. सर्व सोयी-सुविधांनी युक्‍त असे हे टर्मिनल उभे राहणार आहे.

- विठ्ठल राठोड, उपअभियंता, एमआयडीसी, तळेगाव