
टेंभुर्णी (Tembhurni) : टेंभुर्णी शहरातील मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या जुन्या सोलापूर- पुणे महामार्गाच्या काँक्रिट चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याचे संबंधित ठेकेदार तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे अपूर्ण कामासंदर्भात विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
महामार्गाच्या या निकृष्ट कामाचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी (ता. २१) टेंभुर्णीतील ओढ्यावरील अपूर्ण पुलाच्या बांधकामावर सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत भजन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. यासंदर्भात तालुकाध्यक्ष बोबडे म्हणाले, टेंभुर्णी शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, या रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने व लोकांच्या सोयीचे होणे गरजेचे आहे. परंतु अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने व निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे. या कामाच्या माहितीबाबत संबंधित ठेकेदार तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा तोंडी तसेच लेखी स्वरूपात विचारणा करून देखील त्याची व्यवस्थित माहिती दिली जात नाही. या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते हस्तांतरित केले जाईल. त्यापूर्वी त्या कामाची संपूर्ण माहिती ग्रामपंचायत कार्यकारी समितीकडे देणे गरजेचे आहे. टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लेखी मागणी करून तसेच प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याचा प्रयत्न केला; परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण ठेवले असून, त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्याच्या मध्यभागी करण्यात आलेला दुभाजकही अतिशय निकृष्ट दर्जाचा असून, आताच त्याची तुटफूट होत आहे. दुभाजकात लावण्यात आलेल्या इलेक्ट्रिक पोल व त्याचे लाइट कनेक्शन यासह अनेक कामे अपूर्ण आहेत. या निवेदनाच्या प्रती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी आदींना देण्यात आल्या आहेत.
या रस्त्याच्या कामासंदर्भात संपूर्ण कागदपत्रांसह चर्चा होणे गरजेचे आहे. सोमवारपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी, रस्त्याच्या कामाचे संबंधित ठेकेदार, ग्रामपंचायत कार्यकारी समिती, महायुती तसेच महविकास आघाडीतील पक्षाचे प्रत्येकी दोन पदाधिकारी व पत्रकारांची संयुक्त बैठक घेण्यात यावी, यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
- योगेश बोबडे, भाजप तालुकाध्यक्ष, माढा