Navale Bridge
Navale Bridge Tendernama
पुणे

Katraj Bypass Accident : एनएचएआयच्या 'या' घोषणेमुळे खरेच अपघातांची मालिका थांबणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कात्रज बायपासजवळील तीव्र उतारावर होणारे अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. जांभूळवाडी व्हायाडक्ट ते सनसिटी अंडरपास असा सुमारे ५.२ किलोमीटर तसेच किवळे जंक्शन ते बालेवाडी स्टेडीयम असा सुमारे ८.६ किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल बांधण्याचा हा प्रस्ताव आहे. यास मंजुरी मिळाल्यानंतर तीन वर्षांत दोन्ही उड्डाणपूल बांधले जातील. यासाठी सुमारे ४,२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे या भागातील अपघातांचे प्रमाण कमी होण्याची तसेच वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्याची अपेक्षा आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नवले पूल, कात्रज बाह्यवळण आदी ठिकाणी होणाऱ्या अपघातांच्या कारणांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर या कामाचे ‘डीपीआर’ (सविस्तर प्रकल्प अहवाल) ऑगस्टमध्ये रस्ते व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाला पाठविण्यात आले. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

सर्वेक्षणाचे निष्कर्ष

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अपघातांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी त्या रस्त्यांवर सर्वेक्षण केले. त्याचे निष्कर्ष ः

- जांभूळवाडी ते देहूरोड जंक्शनपर्यंत अपघातांचे प्रमाण जास्त

- जांभूळवाडी ते नवले पूलादरम्यान ब्रेक निकामी होणे हे मुख्य कारण

- किवळे जंक्शन येथे तीव्र वळण असल्याने जास्त अपघात

- नवले पूल, किवळे, भूमकर चौक, वाकड, पुनावळे, ताथवडे अशा ठिकाणी अंडरपासजवळ वाहतूक कोंडी जास्त

- अशा ठिकाणी एका लेनवरून वाहतूक वळविणे शक्य नसल्याने अतिरिक्त उपाययोजना आखण्याची गरज

- उड्डाणपुलामुळे वाहनचालकांना कात्रज बाह्यवळणावरील तीव्र उतारावरून जावे लागणार

असा आहे प्रकल्प :

- ‘डीपीआर’नुसार अंतर : ५० किलोमीटर

- उड्डाणपूल पहिला : किवळे जंक्शन ते बालेवाडी स्टेडीयम ः ८.६ किलोमीटर

- उड्डाणपूल दुसरा : जांभूळवाडी व्हायाडक्ट ते सनसिटी अंडरपास : ५.२ किलोमीटर

- एकूण खर्च : ४,२०० कोटी रुपये

- किवळे जंक्शन ते बालेवाडी स्टेडिअम दरम्यानचा उड्डाणपूल ः ६ लेन

- जांभूळवाडी व्हायाडक्ट ते सनसिटी अंडरपास दरम्यानचा उड्डाणपूल ः ३ लेन

- भूमकर नगर ते ओंकार कॉलनी : ४ लेन

- किवळे उड्डाणपूल : ३ लेन

- किवळे अंडरपास : ४ लेन

- देहू रस्ता उड्डाणपूल : ३ लेन

अपघाताचे प्रमाण व वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन उड्डाणपूल बांधण्याबाबत मंत्रालयाला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तीन वर्षांत दोन्ही उड्डाणपूल बांधले जातील.

- भारत तोडकरी, सल्लागार अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण