मुंबई (Mumbai): हिंजवडी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसह विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे. संबंधित यंत्रणांनी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. तसेच पीएमआरडीएने तयार केलेल्या सुमारे ४२६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक नागरिक आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चाकणच्या धर्तीवर हिंजवडीसाठी टास्क फोर्स
हिंजवडी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील आणि राज्याच्या उत्पन्नातील महत्त्वाचा घटक असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. परिसरात पीएमआरडीए, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड महापालिका, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि ग्रामपंचायती अशा अनेक यंत्रणा कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चाकणच्या धर्तीवर हिंजवडीसाठी विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित विभागांनी आपल्या कामाची ‘ब्लूप्रिंट’ तयार करून तातडीने कार्यवाही सुरू करावी. रस्ते, मेट्रो, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पाणी आणि वीजपुरवठ्याबाबत दर आठवड्याला समन्वय बैठक घेण्यात येणार आहे.
४२६ कोटींच्या विकास आराखड्याला गती
पीएमआरडीएने तयार केलेल्या सुमारे ४२६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची जलदगतीने अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
रोज ५ ते ६ लाख नागरिकांची ये-जा
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सादरीकरणानुसार हिंजवडी परिसरात दररोज सुमारे ५ ते ६ लाख नागरिकांची ये-जा होते. प्रवेश आणि निर्गमनासाठी मर्यादित मार्ग असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.
तातडीच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (MSF) १०० जवान तैनात करणे, गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांना प्रतिबंध करणे आणि आयटी कंपन्यांच्या कामकाजाच्या वेळेत आवश्यक बदल करण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले. रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
सहा समांतर रस्त्यांची योजना
भुजबळ, लक्ष्मी आणि हिंजवडी चौकांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सहा नवीन समांतर रस्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या रस्त्यांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
पुढील दीड वर्षात सुमारे ६० किलोमीटर ड्रेनेज नेटवर्क, पादचारी मार्ग आणि पथदिवे उभारण्याचेही नियोजन आहे. ग्रामपंचायतीमार्फत कचरा संकलित करून तो प्रक्रियेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पाठविण्याचा प्रस्ताव आहे.
पवना धरणातून पाणीपुरवठ्याचे नियोजन
हिंजवडीतील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पवना धरणातून पाणी उपलब्ध करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा आराखडा जिल्हाधिकारी डुडी यांनी मांडला. यासंदर्भातील पूर्वीच्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
मेट्रोच्या पहिल्या १२ स्थानकांना सीएमआरएस मंजुरी
मेट्रो स्थानकांपासून आयटी पार्कपर्यंत कामगारांना सुलभ वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी ४२६ कोटी रुपयांच्या ‘लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी’ प्रकल्पाची माहिती देण्यात आली. मेट्रोच्या पहिल्या १२ स्थानकांना सीएमआरएसची मंजुरी मिळाली असून सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
हिंजवडीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनासोबत नागरिक आणि स्थानिक कंपन्यांनीही जबाबदारी ओळखून समन्वयाने काम करावे, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.
Key Points
हिंजवडीच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचे निर्देश,
पीएमआरडीएच्या सुमारे ४२६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला गती,
दररोज ५ ते ६ लाख नागरिकांच्या ये-जा लक्षात घेऊन वाहतूक उपाययोजना,
सहा नवीन समांतर रस्ते आणि १०० MSF जवान तैनातीचे प्रस्ताव,
पुढील दीड वर्षात ६० किमी ड्रेनेज, पादचारी मार्ग व पथदिव्यांचे नियोजन,
पवना धरणातून एमजेपीच्या योजनेद्वारे पाणीपुरवठ्याचा आराखडा.