Dam Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : मराठवाडी धरण यंदा पूर्णक्षमतेने भरणार का?

Marathwadi Dam : पाण्याच्या फुगवट्यामुळे जिंती परिसरातील काही वाड्यावस्त्यांत दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने तेथे वांग नदीवर उंच पुलाचे बांधकाम केल्यानंतरच चाचणी होऊ शकते.

टेंडरनामा ब्युरो

कराड (Karad) : मराठवाडी धरणाचे तब्बल २७ वर्षांनंतर बांधकाम पूर्णत्वाला आले असताना यंदा पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याची चाचणी होणार की नाही? याबद्दल साशंकताच आहे.

पाण्याच्या फुगवट्यामुळे जिंती परिसरातील काही वाड्यावस्त्यांत दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने तेथे वांग नदीवर उंच पुलाचे बांधकाम केल्यानंतरच चाचणी होऊ शकते. पुलाची बांधकाम पूर्व प्रक्रिया अजून टेंडरमध्येच असल्याचे समजते.

मराठवाडी धरणाचे १९९७ मध्ये सुरू झालेले बांधकाम पूर्णत्वाला येण्यास २०२४ उजाडले. सुमारे १४ वर्षांपूर्वी धरणाची अंशतः घळभरणी केल्यापासून त्यात पाणी अडवायला सुरुवात करण्यात आली. जसजसा बांधकामाचा उरक होईल तसतसा टप्प्याटप्प्याने पाणीसाठा वाढविण्यात येत आहे.

आता २७ वर्षांनंतर बांधकाम पूर्णत्वास आल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात त्यात पूर्ण क्षमतेने म्हणजे २.७३ टीएमसी पाणीसाठा होईल, असा अंदाज होता. मात्र, वांग नदीत जिंती परिसरात येणारा धरणाच्या पाण्याचा फुगवटा आणि तेथे बारमाही वाहतूक, योग्य उंच पुलाच्या बांधकामाअभावी नदीपलीकडील जितकरवाडी, शिंदेवाडी, धनावडेवाडी आदी गावे संपर्कहीन होण्याची भीती आहे.

यामुळे पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याऐवजी तो चाचणी स्वरूपात करण्याचा निर्णय झाला होता. धरणाची गेट व्यवस्थित काम करताहेत का? यासह अन्य बाबी त्यातून तपासून घेण्यात येणार होत्या. मात्र, दळणवळण ठप्प होण्याची भीती व अन्य काही कारणांमुळे आता पूल बांधल्यावरच चाचणी घेण्यात येणार असल्याचे समजते.

सध्या तरी पुलाची बांधकाम पूर्व प्रक्रिया अजून टेंडरमध्येच आहे. पुलाचे बांधकाम सुरू करून त्याला वेग दिला, तरच पुढच्या काही महिन्यांत चाचणी करून पुढच्या पावसाळ्यात धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठा होऊ शकतो.