Hasan Mushrif Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

कागलमध्ये 20 एकरांवर 'शाहू सृष्टी'; जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ उभारणार

संग्रहालय, ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती, Adventure Park, डिजिटल माहिती केंद्र, निवास सुविधा आणि शैक्षणिक केंद्राचा समावेश; तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव असलेल्या कागल येथे त्यांचे कार्य, विचार आणि सामाजिक सुधारणांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शाहू सृष्टी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. केवळ संग्रहालय न ठेवता इतिहास, संस्कृती, शिक्षण, पर्यटन आणि निसर्ग यांची सांगड घालणारे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून हा प्रकल्प विकसित करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. कागल नगरपालिका आणि राज्य शासनाच्या निधीतून साकारण्यात येणारा हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी नगरपालिकेची सुमारे २० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्पाचा थ्रीडी आराखडा तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले.

हा प्रकल्प मंत्री हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणार आहे. प्रस्तावित विकास आराखड्यानुसार ‘शाहू सृष्टी’मध्ये शाहू महाराजांच्या जीवनकार्याची आणि सामाजिक विचारांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मांडणी करणारे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यासोबत ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती, डिजिटल माहिती केंद्र, प्रदर्शन दालने आणि अॅम्फिथिएटरची सुविधा असेल.

पर्यटकांसाठी साहसी उपक्रमांचा समावेश असलेले Adventure Park, क्लब हाऊस, पर्यटन निवास, स्थानिक खाद्यपदार्थ आणि स्मृतिचिन्हांच्या विक्रीची सुविधा प्रस्तावित आहे. झिपलाइन, रोप-कोर्स यांसारख्या साहसी उपक्रमांसह बँक्वेट हॉल, प्रशस्त लॉन, रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, जीम आणि इनडोअर गेम्स अशा सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. कॉटेज आणि डॉर्मिटरीसह निवासाच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शाहू महाराजांचे शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, कला, क्रीडा, उद्योग आणि लोककल्याणातील योगदान आधुनिक आणि अनुभवाधारित पद्धतीने पर्यटक आणि विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात येणार आहे. त्यांच्या जन्मस्थान आणि जीवनप्रवासाशी संबंधित वास्तूंच्या प्रतिकृती तसेच महाराणी लक्ष्मीबाई जलाशय आणि रंकाळा तलावाच्या प्रतिकृतीही परिसरात साकारण्यात येणार आहेत. प्रमुख आकर्षण म्हणून शाहू महाराजांचा भव्य पुतळाही उभारण्यात येणार आहे.

शाहू महाराजांच्या विचारांचे अध्ययन, संशोधन आणि समाजजागृतीसाठी स्वतंत्र प्रशासकीय व शैक्षणिक केंद्र विकसित करण्याची संकल्पना आहे. विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी बहुउद्देशीय सभागृह तसेच कला आणि संस्कृतीसाठी खुल्या रंगमंचाची सुविधा प्रस्तावित आहे.

‘शाहू सृष्टी’च्या विकासाला व्यापक स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोरही प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कागलच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्याबरोबरच राजर्षी शाहू महाराजांचा समतावादी आणि पुरोगामी विचार देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

Key Points

  • कागलमध्ये सुमारे २० एकरांवर ‘शाहू सृष्टी’ प्रकल्प उभारणार,

  • कागल नगरपालिका आणि राज्य शासनाच्या निधीतून प्रकल्प साकारला जाणार,

  • तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन,

  • संग्रहालय, डिजिटल माहिती केंद्र आणि ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृतींचा समावेश,

  • Zipline, Rope Course आणि Adventure Parkसह विविध सुविधा प्रस्तावित,

  • निवास, रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, जीम आणि Indoor Gamesची सुविधा,

  • शाहू महाराजांच्या विचारांसाठी स्वतंत्र शैक्षणिक व संशोधन केंद्र विकसित करणार.