सोलापूर (Solapur) : मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधी झाल्यामुळे मंगळवेढेकरांच्या प्रलंबित प्रश्नांना आता न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोटनिवडणुकीतून राज्याला कलाटणी देण्यामध्ये पंढरपूर- मंगळवेढ्याने निर्णायक भूमिका बजावत समाधान आवताडे यांना आमदार केले. तीन वर्षांत त्यांनी मतदारसंघात कोट्यवधींचा निधी आणला. या मतदारसंघात रखडलेल्या म्हैसाळ योजनेला केंद्राच्या माध्यमातून निधी उपलब्ध केल्याने दक्षिण भागात फडणवीस यांच्याच कार्यकाळात पाणी उपलब्ध झाले.
प्रलंबित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदामंत्री असताना लोकसभा निवडणुकीपूर्वी सुधारित दराप्रमाणे प्रशासकीय मान्यता देत पहिल्या टप्प्याची तर विधानसभा निवडणुकीपूर्वी दुसऱ्या टप्प्याची टेंडर काढत या योजनेचे भूमिपूजन केल्यामुळे आगामी काळात या योजनेसाठी मुख्यमंत्री झाल्याने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्धीच्या अपेक्षेची पूर्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्याचबरोबर समतेचा, बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी देखील फडणवीस मुख्यमंत्री असताना मंजुरी मिळाली, मात्र त्यानंतरच्या काळात स्मारक समिती व निधी उपलब्ध करण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तोही प्रश्न रखडला. तो प्रश्न मार्गी लागला तर मंगळवेढा तालुक्यात भविष्यात पर्यटन वाढून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
याशिवाय संत चोखोबा स्मारकाचा प्रश्न देखील सध्या मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर आहे. त्यामुळे या दोन स्मारकांना निधी मिळण्यासाठी समाधान आवताडे आमदार झाल्यामुळे साहजिकच मंगळवेढेकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाधान आवताडे यांना मंगळवेढेकरांनी आमदार केले. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी देखील आवताडेंना आमदार करा, आपली ताकद पाठीशी असल्याचा शब्द फडणवीसांनी दिला. मतदारसंघाने फडणवीसांचा शब्द दोन वेळा मानत मताधिक्य देण्याचे काम केले.