
पिंपरी (Pimpri) : अडीच वर्षांचे उद्दिष्ट्ये ठेवून पिंपरी ते निगडी मेट्रो (Pimpri To Nigadi Metro) मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले आहे.
प्रशासनाच्यावतीने कामाला गती देखील देण्यात आली आहे. सध्या १३ पिलर आणि २८ ठिकाणी पाया भरणीचे काम सुरू केले आहे. कामाची सुरवात संथ गतीने होते. त्यानंतर ही कामे वेगाने केली जातात, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाल्यास शहरातील नागरिकांना निगडीपर्यंत मेट्रोचा प्रवास करणे सुखकर होणार आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) संचालित पुणे मेट्रो प्रकल्पाच्या टप्पा-१ स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडीचे काम सप्टेंबर २०२४ रोजी पूर्ण होऊन टप्पा-१ वरील प्रवासी सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका हा मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या विस्तारित मार्गाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर पुणे मेट्रो प्रशासनाने १६ डिसेंबर रोजी बांधकामाचे टेंडर प्रसिद्ध केले होते. ६ मार्च रोजी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन केले होते तर प्रत्यक्ष कामाला मे महिन्यात सुरू झाले होते.
सुरवातीला रस्ते बंद करून खोदाई करण्याचे काम केले जात होते. त्यासाठी वाहतूक नियोजन व इतर बाबींचा विचार करावा लागत होता. सुरवातीच्या कामांना संथ गती होती. मात्र एकदा काम अर्ध्यावर आल्यानंतर त्याला गती प्राप्त होते, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली.
सध्या चिंचवड, आकुर्डी, निगडी प्राधिकरण आणि भक्ती-शक्ती चौक या ठिकाणी पाया बांधण्याचे, सेगमेंट कास्टिंग आणि पिलर बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. १५१ पैकी २८ पाया, १३३७ पैकी २०१ सेगमेंट कास्टिंग आणि १५१ पैकी १३ पिलरचे काम सुरू झाले आहे. या भागात मेट्रोच्या कामाला स्थानिक तसेच नागरी प्रशासनाचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले.
सध्याची कामाची स्थिती -
सेगमेंट कास्टिंग - १,३३७ पैकी २०१
पिलर बांधणे - १५१ पैकी १३
पाया बांधणे - १५१ पैकी २८
तळेगावात सेगमेंट कास्टिंग
मेट्रो प्रशासनाच्यावतीने सेगमेंट कास्टिंग उभारणीचे काम केले जाणार आहे. एकूण एक हजार ३३७ ठिकाणी हे काम उभारले जाणार आहे. त्याचे काम तळेगाव येथे सुरू आहे. काम पूर्ण होईल, तसे शहरात उभारणी केली जाणार आहे.
अडीच वर्षात म्हणजेच ३० महिन्यात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्ये ठेवली आहेत. पाया बांधणे, पिलर उभारणे आदींसह काही कामे सुरू आहेत. कामाला सुरवात करताना वाहतूक समस्यासह इतर बाबींचा विचार करायचा असतो. त्यामुळे काम हळू होते. मात्र त्यानंतर त्याला गती प्राप्त होईल.
- हेमंत सोनवणे, जनसंपर्क अधिकारी, मेट्रो.