Missing Link Tendernama
मुंबई

Missing Link: प्रतीक्षा संपली; मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट! मार्चमध्ये मिसिंग लिंक...

मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात; वाढीव खर्च आणि आव्हानांची तटबंदी ओलांडत मार्चअखेर प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करण्यासाठी आखलेला 'मिसिंग लिंक' प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. अनेक तारखा उलटून गेल्यानंतर आणि खर्चाचा आकडा हजारो कोटींनी वाढल्यानंतर, आता मार्चअखेर हा मार्ग खुला होण्याचे संकेत मिळत आहेत.

निसर्गाची आव्हाने आणि तांत्रिक गुंतागुंत यामुळे लांबणीवर पडलेला हा प्रकल्प पूर्ण झाल्यास प्रवाशांचा वेळ तर वाचेलच, शिवाय घाटातील अवघड वळणांतून सुटका होणार आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांचा इतिहास पाहता, दिलेली ही नवी मुदत तरी पाळली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खोपोली ते कुसगाव दरम्यान १९.८० किलोमीटर लांबीचा 'मिसिंग लिंक' प्रकल्प हाती घेतला. २०१९ मध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली तेव्हा हा मार्ग २०२२ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, निसर्गाचे रौद्र रूप, भौगोलिक अडथळे आणि तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पाचा कालावधी सतत वाढत गेला.

डिसेंबर २०२२ पासून ते डिसेंबर २०२५ पर्यंत अनेक वेळा कामाच्या पूर्णत्वाच्या तारखा बदलण्यात आल्या. आता ही प्रतीक्षा संपणार असल्याचे सांगण्यात येत असून ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.

या विलंबामुळे केवळ वेळच गेला नाही, तर प्रकल्पाच्या खर्चातही मोठी भर पडली आहे. सुरुवातीला ६८५० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आता अंदाजे ७५०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. म्हणजेच मूळ खर्चात सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली आहे.

डोंगराखालून आणि तलावाखालून बोगदे तयार करणे तसेच प्रचंड उंचीवर पूल बांधणे ही कामे अत्यंत जोखमीची असल्याने खर्चाचा आकडा वाढल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक असण्यामागे काही महत्त्वाची भौगोलिक कारणे आहेत. यामध्ये आशिया खंडातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे आणि अतिशय उंचावर असलेल्या पुलांचा समावेश आहे.

लोणावळ्याजवळील सह्याद्रीच्या रांगांमध्ये उन्हाळा, वारा आणि पावसाळ्यातील अतिवृष्टीचा सामना करत काम करणे कामगारांसाठी आणि अभियंत्यांसाठी कठीण परीक्षा होती. दर्याखोऱ्यांत केबलच्या सहाय्याने उभारलेले पूल हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. या तांत्रिक गुंतागुंतीमुळेच कामाची गती मंदावली आणि खर्चात वाढ झाली.

सध्या या महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने घाट परिसरात अनेकदा वाहतूक कोंडी होते. विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी लोणावळा खंडळा भागात प्रवाशांचे तास खोळंबतात. मिसिंग लिंक पूर्ण झाल्यावर प्रवाशांना हा घाट उतरून जाण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे प्रवासाचा वेळ किमान २० ते २५ मिनिटांनी कमी होणार आहे. सध्या ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याचे सांगत अधिकारी मार्चपर्यंत शंभर टक्के काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करत आहेत.

मात्र, गेल्या तीन-चार वर्षांत वारंवार हुकलेल्या मुदती पाहता प्रवाशांमध्ये साशंकता आहे. मार्चअखेर ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यास मुंबईकरांना आणि पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल. आता प्रशासन ही नवी डेडलाईन पूर्ण करून प्रकल्प खरोखरच जनतेच्या सेवेत दाखल करते की पुन्हा एकदा नवीन तारीख समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.