Pune: पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने दिली Good News!
पुणे (Pune): पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी प्रशासनाने ‘डिजिटल लॉकर’ची सुविधा उपलब्ध केली आहे. हे लॉकर फलाट क्रमांक एकवर असून, प्रवाशांच्या सेवेत ते नुकतेच दाखल झाले.
रेल्वेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या ‘नॉन-फेअर रेव्हेन्यू’ उपक्रमांतर्गत ही सेवा खासगी भागीदारीतून सुरू केली आहे.
पुणे स्थानकावर पूर्वीपासून ‘क्लॉक रूम’ची सुविधा आहे. मात्र, ही खुल्या अवस्थेत आहे. तुलनेने सुरक्षितता कमी आहे. हे लक्षात घेत आता डिजिटल लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे डिजिटल लॉकर फलाट एकवरच्या मुंबईच्या दिशेने मल्टिपर्पज स्टॉलच्या बाजूला आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार येथे एकूण २४ लॉकर उपलब्ध केले असून, त्यात मध्यम, मोठे व अति मोठे असे तीन पर्याय उपलब्ध आहेत.
लॉकरचे दर असे...
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी वेळेनुसार भाड्याचे दर निश्चित केले आहेत.
१. मध्यम लॉकर : सहा तासांसाठी ६० रुपये, २४ तासांपर्यंत १४० रुपये.
२. मोठे लॉकर : सहा तासांसाठी १४० रुपये, २४ तासांपर्यंत १७० रुपये.
३. अति-मोठे लॉकर : सहा तासांसाठी १७० रुपये, २४ तासांपर्यंत २७० रुपये.
...असा करा लॉकरचा वापर
- सर्वांत आधी मशिनवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करा
- त्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो मशिनमध्ये टाका
- हव्या असलेल्या लॉकरचा आकार व वेळेची निवड करा
- डिजिटल पद्धतीने पेमेंट केल्यानंतर लॉकर उघडेल अन् सामान ठेवा
- सामान काढताना पुन्हा एकदा क्यूआर कोड स्कॅन करून नवीन ओटीपीचा वापर करा
प्रवाशांचे सामान सुरक्षित राहण्यासाठी डिजिटल लॉकरची सुविधा सुरू केली आहे. यासाठी वेळेची मर्यादा असणार आहे. प्रवाशांनी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ सामान लॉकरमध्ये राहिल्यास संबंधित प्रवाशाला अतिरिक्त वेळेसाठी अधिकची रक्कम द्यावी लागेल.
- हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे

