

नाशिक : एनटीपीसी आणि महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी (महाजनको) यांनी इंडियाबुल्स सेझमधील रतन इंडिया या कंपनीचा दिवाळखोरीत गेलेला सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड (STPL) यांनी सादर केलेल्या या प्रकल्पाच्या रिझोल्यूशन प्लॅनला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने २८ नोव्हेंबर रोजी अधिकृत मंजुरी दिली होती. त्यानंतर एनटीपीसी लिमिटेड आणि महाजनको यांच्यात दोन दिवसांपूर्वी भागधारक करार करण्यात आला.
या करारामुळे तब्बल १३५० मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळाला आहे. याबाबत एनटीपीसी लिमिटेडने एक्स या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करीत अधिकृत माहिती दिली आहे.
राज्यराज्य शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मुसळगावच्या शेतकऱ्यांकडून ४१८.०२ हेक्टर व गुळवंचच्या शेतकऱ्यांकडून ९७६.१५ हेक्टर क्षेत्र एमआयडीसीने २००६ मध्ये खरेदी केले होते. त्यातील पंधरा टक्के विकसित भूखंड जमीन धारकांना परत केल्यानंतर शासनाने उर्वरित ९०० हेक्टर भूखंड एमआयडीसीच्या माध्यमातून इंडियाबुल्सला भाडेतत्वावर दिले.
या जागेवर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, तेथे कोळसा पुरवठा करण्यासाठी रेल्वे सुविधा नसल्याने २७० मेगावॅट प्रकल्पाची केवळ चाचणी होऊन तो २०१५ पासून बंद आहे. हा प्रकल्प २०२० पासून आर्थिक संकटात असल्याचे अधिकृत जाहीर करण्यात आले. रतन इंडिया कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने या कंपनीची प्रमुख कर्जदार वित्तीय संस्था पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे दावा दाखल केला.
दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने इंडियाबुल्सला सेझसाठी दिलेल्या ९०० हेक्टर जमिनीपैकी पडून असलेल्या ५१२ हेक्टर जमिनीचे मे २०२४ मध्ये हस्तांतरण केले. मात्र, त्याविरोधात कंपनी न्यायालयात गेली आहे.
रतन इंडियाने २०२० मध्ये दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर ऑक्टोबर २०२२ कॉर्पोरेशनने दिवाळखोरी लवादात (NCLT) याचिका दाखल केल्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये यामध्ये प्रकल्प विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. त्या लिलाव प्रक्रियेत महाजनको–एनटीपीसी कंसोर्टियमने तब्बल साडेतीन हजार कोटींहून अधिक बोली लावून सर्वाधिक पात्र बोलीदार म्हणून आघाडी घेतली.
या प्रकल्पाच्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी काही जमिनीशी संबंधित अडथळे होते. त्या निकाली निघाल्यानंतर वीज निर्मितीला वेग येईल, अशी अपेक्षा आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील वाढती वीज मागणी पूर्ण होण्यास मोठी मदत होणार असून, उद्योग, शेती आणि घरगुती वीजपुरवठा अधिक स्थिर होणार आहे.
उर्जा सुरक्षा, जबाबदार विकास आणि शाश्वत प्रतिष्ठेच्या दृष्टीने सिन्नर धार्मल पॉवर प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, राज्याच्या ऊर्जा क्षेत्रावर सिन्नरचे स्थान अधिक बळकट करणार आहे. स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी व औद्योगिक वसाहतींना स्थिर वीजपुरवठा होऊ शकणार आहे.