Nashik News: नाशिकचा प्रचार विकासाच्या वळणावर! डिफेन्स कॉरिडॉर, MIDC पण आयटी पार्क अजूनही 'घोषणेतच'

मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन देत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर
नाशिकचा प्रचार विकासाच्या वळणावर
NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक महापालिका (NMC) निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, सलग तीन दिवस झालेल्या प्रचार सभांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाषणामध्ये नाशिकला डिफेन्स कॉरिडॉर, एक हजार एकरवर नवीन एमआयडीसी व दाओसच्या बैठकीत नाशिकला मोठी गुंतवणूक आणण्याचे आश्वासन दिले आहे.

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उद्योग प्रदर्शनी केंद्र उभारण्याचे आश्वासन देत नाशिकच्या विकासाची हमी दिली आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यात नाशिकचा प्रचार विकास कामांवर येऊन ठेपला असल्याचे दिसत आहे.

नाशिकचा प्रचार विकासाच्या वळणावर
Pune: पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने दिली Good News!

भारतीय जनता पक्षाकडे महापालिकेची पाच वर्षे सत्ता होती, त्या काळात नाशिकला काय मिळाले, हा मुद्दा नाशिक महापालिका निवडणूक प्रचारात सुरुवातीपासून विरोधकांसह महायुतीतील मित्रपक्षांकडून विचारला जात होता.

मागील निवडणुकीच्या प्रचार सभेत फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर नाशिकला नाव घेण्यासारखा एकही मोठा प्रकल्प आला नसल्याचे कारण देत दत्तक पित्याने नाशिकला काय दिले, असा प्रश्न विचारला जात असतो. तसेच नाशिकच्या साधुग्राम मधील वृक्षतोडी बाबत मुख्यमंत्री काय बोलतात, याकडे लक्ष होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वृक्षतोड प्रकरणी न्यायालयाचा निर्णय मान्य केला जाईल, असे आश्वासन देतानाच साधुग्राममध्ये कोणताही व्यापारी प्रकल्प उभारला जाणार नाही, अशी आमची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.

केंद्र व राज्य सरकारने नाशिकसाठी काय केले, याची जंत्रीच त्यांनी वाचून दाखवली. त्यात प्रामुख्याने नाशिकमध्ये गेल्या काही वर्षांत ५७ हजार कोटींची गुंतवणूक आल्याचे प्रकल्पनिहाय आकडेवारी देत सांगितले.

तसेच ओझर येथे एचएएलमध्ये विमान बनवण्यात येणार असून केंद्र सरकारने महाराष्ट्रात तीन डिफेन्स कॉरिडॉरला परवानगी दिली आहे. त्यातील एक कॉरिडॉर नाशिक येथे होणार असून त्यासाठी एक हजार एकरवर एमआयडीसी उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

याचवेळी त्यांनी सिंहस्थ कुंभमेळानिमित्ताने नाशिक परिसरात सुरू असलेल्या २५ हजार कोटींच्या कामांचा उल्लेख केला.  गोदावरी स्वच्छता, नाशिकमधील चांगले रस्ते, नाशिक रिंगरोड, रामकाल पथ या प्रकल्पांमुळे नाशिक एक आधुनिक शहर म्हणून उदयास येणार असून पालघरमधील वाढवण बंदरामुळे नाशिकचा सर्वाधिक विकास होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयटीपार्कची पुन्हा घोषणा

नाशिकमध्ये आयटी कंपन्या नसल्याने येथील युवकांना पुणे, बेंगळुरू, हैदराबाद येथे जावे लागते. यामुळे आयटी पार्क हा नाशिकचा जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत या आयटी पार्कची केवळ घोषणा होते. भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना २०२२ मध्ये महापालिकेने यासंदर्भात एक परिषद घेतली होती.

त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आयटी पार्कच्या जागेचा फुटबॉल करीत ती जागा कधी अक्राळे कधी आडगाव कधी राजूर अशी फिरवली. अखेर राजूर येथे एमआयडीसीमध्ये ५० एकर जागेची अधिसूचना प्रसिद्ध झाली, पण पुढे काहीही प्रगती झाली नाही.

विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नाशिकला आयटी पार्क उभारण्याबाबत घोषणा केली. आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही आयटी पार्क उभारणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर फडणवीस यांनीही आश्वासन दिले आहे. सातत्याने घोषणेच्या पातळीवर असलेल्या आयटी पार्कबाबत घोषणा करण्यास राजकारणी थकत नाहीत, हे या निवडणुकीतही दिसले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com