मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रातील २२ शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या पीएम ई-बस सेवा योजनेची अंमलबजावणी निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या शहरांमध्ये टेंडर प्रक्रिया सुरू आहे, ती वेळेत पूर्ण करून पुढील कार्यवाहीला वेग द्यावा, तसेच चार्जिंग स्टेशन, बस डेपो आणि अन्य आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत तयार ठेवाव्यात, अशा सूचना अर्बन ट्रान्सपोर्ट विभागाचे संचालक भानू प्रताप सिंह भदौरिया यांनी दिल्या.
महाराष्ट्र सदन येथे निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पीएम ई-बस सेवा योजनेच्या प्रगतीचा शहरनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी निधीचा वापर, टेंडर प्रक्रिया, ई-बसेसच्या संचालनाची तयारी, चार्जिंग स्टेशन, बस डेपो तसेच आवश्यक पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
तीन शहरांत ई-बस सेवा सुरू
नागपूर, सोलापूर आणि ठाणे येथे ई-बस सेवा कार्यान्वित झाली आहे. उर्वरित शहरांमध्ये आगामी दोन महिन्यांत सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान बससेवा सुरू करण्यास सज्ज असलेल्या शहरांनी त्याबाबतचे पत्र सादर करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
अहिल्यानगर, अकोले, अमरावती, भिवंडी, चंद्रपूर, इचलकरंजी, धुळे, जळगाव, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, मीरा भाईंदर, नागपूर, परभणी, नाशिक, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर, वसई-विरार आणि नांदेड या शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे.
टेंडर आणि पायाभूत सुविधांवर भर
ज्या शहरांमध्ये टेंडर प्रक्रिया सुरू आहे, ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय तसेच तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून केंद्र आणि राज्यातील संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे भदौरिया यांनी सांगितले.
ई-बस सेवा सुरू करण्यापूर्वी चार्जिंग पायाभूत सुविधा आणि बस डेपोची तयारी पूर्ण क्षमतेने झालेली असावी, यावरही बैठकीत भर देण्यात आला. आवश्यक सामग्री आणि अन्य बाबींच्या पुरवठ्यासाठी केंद्रस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे.
प्रकल्पाचे काम पूर्ण झालेल्या शहरांसाठी लवकरच विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत अंतिम बिल, उपयोगिता प्रमाणपत्र आणि प्रकल्पाच्या अंतिम कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
यावेळी निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी आर्थिक आणि भौतिक प्रगती निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर दिला. पर्यावरणपूरक आणि नागरिककेंद्रित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने पीएम ई-बस सेवा योजनेची वेळबद्ध अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
Key Points
महाराष्ट्रातील २२ शहरांमध्ये पीएम ई-बस सेवा योजना राबविण्यात येत आहे.
नागपूर, सोलापूर आणि ठाण्यात ई-बस सेवा सुरू झाली आहे.
उर्वरित शहरांमध्ये आगामी दोन महिन्यांत सेवा सुरू करण्याचे नियोजन.
सुरू असलेली टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना.
चार्जिंग स्टेशन आणि बस डेपोची तयारी प्राधान्याने करण्याचे निर्देश.
केंद्र आणि राज्यातील यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यावर भर.
प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना.
पूर्ण झालेल्या प्रकल्पांसाठी अंतिम बिल व उपयोगिता प्रमाणपत्राची कार्यवाही होणार.