ST Bus Stand - MSRTC Tendernama
मुंबई

२०३७ पर्यंत एसटीचा ताफा होणार १०० टक्के इलेक्ट्रिक

सध्या ताफ्यात १४ हजार बसेस, त्यापैकी १,१०० ई-बसेस; सुमारे ५ हजार जुन्या बसेस स्क्रॅप करून आगारनिहाय चार्जिंग सुविधांच्या उभारणीचे नियोजन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) संपूर्ण ताफा २०३७ पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या सुमारे ५ हजार डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल बसेस ठरणार असून, २०२७ पासून जुन्या बसेसचे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटीच्या मुख्यालयात झालेल्या महामंडळाच्या ३१२ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी संचालक मंडळाचे सदस्य आणि महामंडळाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

सध्या एसटीच्या ताफ्यात सुमारे १४ हजार बसेस असून, त्यापैकी १,१०० बसेस इलेक्ट्रिक आहेत. ताफ्यातील सुमारे ५ हजार जुन्या बसेस नियमानुसार टप्प्याटप्प्याने स्क्रॅप करण्यात येणार आहेत. त्यामुळे एसटीच्या ताफ्याचे आधुनिकीकरण आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

२०२७ पासून जुन्या बसेसचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर

सात ते आठ वर्षे वापर झालेल्या जुन्या बसेसचे २०२७ पासून टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. प्रवासी वाहतुकीच्या गरजेनुसार नव्या ई-बसेसची मोठ्या प्रमाणावर खरेदीही केली जाणार आहे.

सध्या डिझेल बसेसचे आयुर्मान सुमारे १५ वर्षे, तर इलेक्ट्रिक बसेसचे आयुर्मान सुमारे २० वर्षे असल्याने ई-बसेसचा अधिक काळ वापर करता येणार आहे. डिझेलवरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे इंधन खर्चात बचत होण्याची अपेक्षा आहे.

चार्जिंग स्टेशन आणि विद्युत सुविधांची उभारणी

इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन, विद्युत पायाभूत सुविधा आणि तांत्रिक यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आगारनिहाय नियोजन करून ई-बसेसची खरेदी आणि चार्जिंग सुविधा उभारणी या दोन्ही प्रक्रिया समांतरपणे राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे वाढत्या इलेक्ट्रिक बस ताफ्याला आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर महामंडळाचा भर राहणार आहे.

‘ई-लालपरी’तून हरित सार्वजनिक वाहतुकीचे लक्ष्य

“एसटी ही महाराष्ट्राच्या प्रत्येक गावाला जोडणारी सार्वजनिक सेवा आहे. तिचे आधुनिकीकरण करताना पर्यावरणाची जबाबदारीही महत्त्वाची आहे. डिझेलवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ, हरित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्याचा आमचा संकल्प आहे. २०३७ पर्यंत एसटीचा १०० टक्के ताफा इलेक्ट्रिक करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही सुरू आहे,” असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी लालपरी भविष्यात हरित महाराष्ट्राची ‘ई-लालपरी’ बनेल. पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचे देशातील आदर्श मॉडेल महाराष्ट्रात उभारण्याच्या दिशेने एसटीची वाटचाल सुरू आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Key Points

  • २०३७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट

  • २०२७ पासून सात ते आठ वर्षे वापर झालेल्या जुन्या बसेसचे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर

  • सध्या एसटीच्या ताफ्यात सुमारे १४ हजार बसेस, त्यापैकी १,१०० ई-बसेस

  • सुमारे ५ हजार जुन्या बसेस नियमानुसार स्क्रॅप करण्याचे नियोजन

  • ई-बसेसच्या खरेदीसोबत आगारनिहाय चार्जिंग स्टेशन आणि विद्युत सुविधांची उभारणी

  • डिझेल बसेसचे आयुर्मान १५ वर्षे, तर ई-बसेसचे आयुर्मान सुमारे २० वर्षे