मुंबई (Mumbai): गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ७अ मार्गिकेचे काम पूर्णत्वाकडे आले असतानाच प्रकल्पासमोर मोठा तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. सुमारे २६० कोटी रुपये खर्चून उभारलेला जवळपास एक किलोमीटरचा पूल पाडण्याची वेळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) येण्याची शक्यता आहे.
विमानतळ परिसरातील सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या (AAI) ‘एअरपोर्ट फनेल झोन’ नियमांनुसार मेट्रो चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) वायरची अतिरिक्त उंची आराखड्यात विचारात घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. OHE वायरची उंची सुमारे २.५ मीटरने अधिक होत असल्याने AAI ने त्यास परवानगी नाकारली आहे.
आराखड्यात तांत्रिक चूक
मेट्रोच्या आराखड्याचे काम सिस्ट्रा (Systra), सीईजी (CEG) आणि एसएमसीआयपीएल (SMCIPL) या सल्लागार कंपन्यांच्या युतीने केले होते. २०२२ मध्ये कामासाठी परवानगी घेताना OHE ची उंची गृहीत धरली गेली नव्हती. ही तांत्रिक चूक २०२५ मध्ये समोर आल्यानंतर संबंधित काम तातडीने थांबवण्यात आले.
फेब्रुवारी २०२६ पर्यंत या पूल मार्गाचे, रॅम्पचे आणि ‘एअरपोर्ट कॉलनी’ स्थानकाचे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झाले होते. मात्र, या तांत्रिक अडचणीवर तोडगा न निघाल्यास हा पूल पाडून पुन्हा नव्याने बांधावा लागणार असल्याचे एमएमआरडीएतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
२०२१ पासून मुहूर्त लांबणीवर
गुंदवली ते विमानतळाला जोडणारी ही मार्गिका ३.४ किलोमीटरची आहे. नागरिकांना दक्षिण मुंबईशी थेट जोडणाऱ्या या मार्गिकेचा मुहूर्त २०२१ पासून लांबत आहे. आता पुलाच्या तांत्रिक अडचणीमुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षातही मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता धुसर झाली आहे.
मेट्रो ७अ सुरू झाल्यानंतर विमानतळापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होण्याची अपेक्षा आहे. मात्र, विद्यमान पुलाचा तांत्रिक प्रश्न कायम राहिल्यास त्याचे पाडकाम आणि त्यानंतर नव्याने बांधकाम करावे लागणार असल्याने प्रकल्पाच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मेट्रो मार्गिका ७ अ प्रकल्पासाठी SYSTRA-CEG-SMCIPL यांची जनरल कन्सल्टंट/इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाचे डिझाइन तसेच विमानतळ परिसरातील उंचीच्या मर्यादांसह आवश्यक सर्व परवानग्यांचा समन्वय करण्याची जबाबदारी सल्लागाराची होती. मात्र, OHE यंत्रणेसाठी लागणाऱ्या अतिरिक्त उंचीची आवश्यकता डिझाइन आणि नियोजनाच्या योग्य टप्प्यावर सल्लागाराकडून पुरेशा प्रमाणात विचारात घेण्यात आली नाही.
या अतिरिक्त उंचीच्या मंजुरीसाठी एमएमआरडीएकडून सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे (AAI) पाठपुरावा सुरू आहे. किती उंचीची परवानगी देता येईल आणि त्यानुसार प्रकल्पात काही बदल करावे लागतील का, याबाबत AAIच्या अंतिम तांत्रिक अहवालाची/पुष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.
AAIचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर एमएमआरडीए त्याचे सविस्तर तांत्रिक मूल्यमापन करून पुढील योग्य निर्णय घेईल.
- बसवराज एम. बी., संचालक, मेट्रो प्रकल्प
Key Points
मेट्रो ७असाठी उभारलेला सुमारे एक किलोमीटरचा पूल अडचणीत
पुलाच्या बांधकामावर सुमारे २६० कोटी रुपये खर्च
OHE वायरची अतिरिक्त उंची आराखड्यात विचारात न घेतल्याचे समोर
OHE वायरची उंची सुमारे २.५ मीटरने अधिक होत असल्याने AAIची परवानगी नाकारली
सिस्ट्रा, सीईजी आणि एसएमसीआयपीएलच्या युतीने मेट्रोचा आराखडा तयार केला
२०२५ मध्ये तांत्रिक चूक समोर आल्यानंतर काम थांबवण्यात आले
फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूल, रॅम्प आणि एअरपोर्ट कॉलनी स्थानकाचे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण
तांत्रिक तोडगा न निघाल्यास पूल पाडून नव्याने बांधण्याची शक्यता
गुंदवली-विमानतळ मेट्रो ७अ मार्गिका ३.४ किलोमीटरची
२०२६-२७ या आर्थिक वर्षातही मेट्रो सुरू होण्याबाबत अनिश्चितता