

नाशिक (Nashik): शहरात टायरबेस्ड मेट्रो निओ प्रकल्प सुरू करण्याबाबतची चर्चा मागे पडल्यानंतर आता नाशिकसाठी नियमित मेट्रो किंवा लाइट मेट्रो सुरू करण्याबाबतची चाचपणी करण्यात येत आहे. महामेट्रोने यावर्षी जानेवारीत केलेल्या वाहतूक सर्वेक्षणात 'मेट्रो' साठी आवश्यक प्रतितास वीस हजार प्रवासी संख्येचा आकडा नाशिक येथे पार झाला आहे. त्यामुळे नियमित 'मेट्रो'चा मार्ग मोकळा झाल्याने याबाबत मुंबई येथे बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत 'महामेट्रो'चे पथक महिनाभरात नाशिकमध्ये येऊन अभ्यास करून अहवाल सादर करणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
महामेट्रोने यापूर्वी जानेवारीत नाशिक शहरात मेट्रो प्रकल्प राबवता येऊ शकतो का, याबाबत सर्वेक्षण केले होते. त्यात मेट्रोसाठी आवश्यक प्रवासीसंख्या आढळून आल्याने नगरविकास विभागाचे अवर सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. नाशिक शहरात यापूर्वी प्रस्तावित करण्यात आलेला निओ मेट्रोचे मार्ग कायम ठेवून महिनाभरात महामेट्रोच्या पथकामार्फत शहरात प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.
नाशिकचे झपाट्याने नागरीकरण होत असल्याने शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने २०१६ मध्ये स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, रस्तेविकास, मालवाहतूक, तंत्रज्ञान व रहदारी अभियांत्रिकी धोरणाचा समावेश करीत अर्बन मास ट्रान्झिट (यूएमटीसी) या दिल्लीस्थित कंपनीने सर्वंकष वाहतूक आराखडा महापालिकेला सादर केला होता.
त्या आराखड्यावरून सिटीलिंक कंपनीची बससेवा सुरू झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकसाठी टायरबेस्ड मेट्रो निओची घोषणा केली होती. त्याबाबत केंद्रिय अर्थसंकल्पात घोषणाही झाली होती. तो प्रकल्प रद्द झाल्याने नियमित मेट्रोबाबतची चाचपणी राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यादृष्टीने नगरविकास विभागाचे अवर सचिव गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कार्याकारी संचालक उपस्थित होते.
महिनाभरात अहवाल
या बैठकीत ठरल्यानुसार 'महामेट्रो'चे पथक महिनाभरात नाशिकमध्ये येऊन अभ्यास करणार आहे. तसेच मुंबई, पुणे आणि नागपूरच्या धर्तीवर कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार नाशिक शहरातील मेट्रोसाठी ३१.४० किमीच्या दोन एलिव्हेटेड कॉरिडोरचे नियोजन करण्यात येणार असून त्यातील पहिला एलिव्हेटेड कॉरिडोर हा १० किलोमीटरचा असणार आहे. दुसरा कॉरिडॉर २२ किलोमीटरचा असणार आहे.
या दोन्ही कॉरिडॉरवर ३० रेल्वेस्थानक असणार आहेत. मेट्रो सुरू झाल्यावर त्यासाठी आवश्यक इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्टेशन प्लॅनवरही चर्चा करण्यात आली. त्यात नाशिकरोड येथील मल्टिमोडल हब ते मेट्रोच्या शेवटच्या स्थानकापर्यंत कनेक्टिव्हिटी कशी राहील यावर चर्चा करण्यात आली. त्यासाठी महिनाभरात 'महारेल'चे अधिकारी नाशिकमध्ये येऊन संभावित मार्गांचा अभ्यास करतील, तसेच संबंधित यंत्रणांसोबत बैठकी घेऊन सरकारला अहवाल सादर करणार आहेत
या मार्गांचा होणार अभ्यास
यापूर्वीच्या २०१८ मध्ये मेट्रोसाठी झालेल्या सर्वेक्षणानुसार ३१.४० किलोमीटर लांबीचे दोन एलिव्हेटेड कॉरिडोर उभारले जाणार होते. नियमित मेट्रोसाठीही तेच मार्ग कायम ठेवले जाणार आहेत. त्यात पूर्वीप्रमाणेच पहिला १० किलोमीटरच्या एलिव्हेटेड कॉरिडोरमद्ये गंगापूर, जलालपूर, गणपतनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी, सीबीएस, मुंबई नाका अशी दहा स्थानके असतील.
दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिकरोड असा २२ किलोमीटरचा असून त्यात गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा कॉर्नर, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्त मंदिर, नाशिकरोड अशी स्थानके असतील. या दोन्ही कॉरिडॉरचा अभ्यास महामेट्रोचे अधिकारी करणार आहेत.