मुंबई (Mumbai): महाराष्ट्रातील मेट्रो जाळ्याचा विस्तार वेगाने सुरू असून पुढील पाच वर्षांत सुमारे ३०० किलोमीटरचे नवीन मार्ग प्रवाशांसाठी सुरू करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. सध्या राज्यात १७४ किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले असून २९१ किलोमीटर मार्गांचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे. मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांत ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रातील मेट्रो जाळ्याचा विस्तार वेगाने सुरू असून पुढील पाच वर्षांत सुमारे ३०० किलोमीटरचे नवीन मार्ग प्रवाशांसाठी सुरू करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. सध्या राज्यात १७४ किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले असून २९१ किलोमीटर मार्गांचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे. याशिवाय १३० किलोमीटर मार्ग मंजुरीच्या प्रक्रियेत, तर ८७.१५ किलोमीटर मार्गांचे सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात डीपीआर तयार केले जात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत राज्यातील मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. मुंबई, पुणे, नागपूर आणि मुंबई महानगर प्रदेशातील प्रकल्पांमुळे सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर प्रत्येक मेट्रो प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
राज्यात २.८० लाख कोटींचे मेट्रो प्रकल्प
राज्यातील मेट्रो प्रकल्पांची एकत्रित किंमत २ लाख ८० हजार ७५५ कोटी रुपये आहे. यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा २७,२१६ कोटी, तर राज्य सरकारचा थेट हिस्सा ५०,२५० कोटी रुपये आहे.
एमएमआरडीए, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नियोजन प्राधिकरणांच्या माध्यमातून ७५,७२९.६२ कोटींचे आर्थिक नियोजन केले जाणार आहे. उर्वरित निधी शासन हमी असलेल्या कर्जातून उभारण्याचे प्रस्तावित आहे.
मेट्रो जाळ्याचा ६८३ किमीपर्यंत विस्तार
मुंबई महानगर प्रदेशात ४२८.८९ किलोमीटर, पुणे महानगर प्रदेशात १६९.४५ किलोमीटर आणि नागपूर महानगर प्रदेशात ८५.२० किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क विकसित केले जात आहे.
कार्यरत, बांधकामाधीन आणि प्रस्तावित मार्गांचा समावेश असलेल्या राज्यातील मेट्रो जाळ्याची एकत्रित लांबी सुमारे ६८३ किलोमीटर आहे. या वर्षात ८७ किलोमीटर मार्ग आणि ५६ स्थानके सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच २०२९-३०पर्यंत नियोजित मार्गांपैकी ३०२ किलोमीटर मार्ग आणि १६१ स्थानके उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जात आहे.
मेट्रो-१०साठी ८,५०० कोटींचा खर्च
बैठकीत मुंबई महानगर प्रदेशातील मीरा गाव ते गायमुख या मेट्रो-१० मार्गाच्या कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आला. या मार्गासंबंधीचे नोटिफिकेशन यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नियोजन आणि आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून प्रकल्पासाठी सुमारे ८,५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ९.६८ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर पाच उन्नत स्थानके उभारली जाणार आहेत. मेट्रो-१०चे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
नवीन मेट्रो मार्गांचे नियोजन
राज्य सरकारकडून मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि नागपूरमध्ये पुढील मार्गांचे नियोजन केले जात आहे.
मुंबई मेट्रो-११ : अणिक डेपो–वडाळा–गेटवे ऑफ इंडिया — १७.५१ किमी
हडपसर–लोणी काळभोर आणि हडपसर–सासवड रोड — १६.६८ किमी
नवी मुंबई मेट्रो-१ए आणि २ : बेलापूर–सागर संगम आणि पेंधर–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ — १७.०९ किमी
कान्हान नदी–कान्हान सिटी, नागपूर फेज-२ विस्तार — १.४५ किमी
मुंबई मेट्रो-८ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ — ३४.९० किमी
मुंबई मेट्रो-१० : गायमुख–छत्रपती शिवाजी महाराज चौक — ९.२० किमी
मुंबई मेट्रो-१३ : शिवाजी चौक–वसई-विरार — २५.०३ किमी
मुंबई मेट्रो-१२ए : मानपाडा–कल्याण–खुटारी–तळोजा — १८.४० किमी
मुंबई मेट्रो-३ विस्तार : कफ परेड–नवी नगर — १.४० किमी
मुंबई मेट्रो-१४ : कांजूर–बदलापूर — ४५.१५ किमी
पुणे मेट्रो फेज-३ : निगडी–वाकड–नाशिक फाटा–चाकण — ४२ किमी
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Key Points
राज्यात १७४ किमी मेट्रो मार्ग कार्यान्वित.
२९१ किमी मार्गांचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू.
१३० किमी मार्ग मंजुरीच्या प्रक्रियेत.
८७.१५ किमी मार्गांचे डीपीआर तयार होत आहेत.
मेट्रो प्रकल्पांची एकत्रित किंमत २,८०,७५५ कोटी रुपये.
पुढील पाच वर्षांत सुमारे ३०० किमी नवे मार्ग सुरू करण्याचे नियोजन.
या वर्षात ८७ किमी मार्ग आणि ५६ स्थानके सुरू करण्याचे उद्दिष्ट.
२०२९-३०पर्यंत ३०२ किमी मार्ग आणि १६१ स्थानकांसाठी कार्यवाही.
मीरा गाव–गायमुख मेट्रो-१०साठी ८,५०० कोटींचा अंदाजित खर्च.
मेट्रो प्रकल्पांचे प्रत्यक्ष काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश.