Devendra Fadnavis Tendernama
मुंबई

Devendra Fadnavis: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 'त्या' प्रकल्पामुळे राज्याला होणार फायदा?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमीपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असून, या सुविधेमुळे राज्यातील उद्योग, निर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीत फेडेक्सने मुंबईत गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय हा भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाचे महत्त्वपूर्ण प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष विजय सिंघल, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि. चे संचालक जीत अदानी, फेडेक्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम, फेडेक्स एमईआयएसच्या अध्यक्षा कामी विश्वनाथन, रिचर्ड स्मिथ, अरुण बंसल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, फेडेक्सची जागतिक स्तरावरील मजबूत उपस्थिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रातील कार्गो हाताळणी आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात भारतातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक व्यग्र प्रवासी व कार्गो विमानतळ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) हा भारताच्या भविष्यातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असून 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देईल. पुरवठा व्यवस्थापन खर्च कमी करणे देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असून फेडेक्ससारख्या कंपन्यांमुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा खर्च कमी होण्यास मदत होईल. महाराष्ट्र हा देशाच्या उत्पादनक्षेत्रात आघाडीवर असून फेडेक्सच्या सुविधेमुळे उद्योग, निर्यात आणि संपूर्ण व्यावसायिक परिसंस्थेला मोठा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रास्ताविक भाषणात अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि.चे संचालक जीत अदानी म्हणाले की, फेडेक्सने नवी मुंबईची केंद्र म्हणून केलेली निवड ही महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाचे प्रतीक आहे. विमानतळाचे जवाहरलाल नेहरू बंदर जवळील धोरणात्मक ठिकाण आणि अत्याधुनिक कार्गो सुविधा यामुळे हे हब जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठरेल. या प्रकल्पामुळे निर्यातदार, लघु-मध्यम उद्योग, औषध व कृषी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी थेट जोडणी मिळेल. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

फेडेक्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या पूर्णपणे स्वयंचलित आणि अत्याधुनिक एअर कार्गो हबचे भूमीपूजन हा भारताच्या जागतिक व्यापार जोडणीतील महत्त्वाचा टप्पा आहे.

फेडेक्सचा हा भारतातील पहिलाच हब असून, ३ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासह उभारला जाणार आहे. फेडेक्सकडून या प्रकल्पात २५० दशलक्ष अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक दीर्घकालीन गुंतवणूक करण्यात येत असून, भारताच्या वाढत्या आर्थिक क्षमतेवरील विश्वासाचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

हा प्रकल्प भारताच्या राष्ट्रीय पुरवठा व्यवस्थापन खर्च धोरण आणि पीएम गतिशक्ती योजना उपक्रमाशी सुसंगत असून देशाची पुरवठा व्यवस्थापन खर्च क्षमता वाढविण्यास मदत करेल. फेडेक्सचे नेटवर्क सुमारे २२० देशांमध्ये कार्यरत असून, नवी मुंबई हबमुळे भारत जागतिक पुरवठा साखळीत अधिक प्रभावीपणे सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.