Ashish Shelar Tendernama
मुंबई

दहिसर ट्रान्सपोर्ट हबच्या कामात नियमांचे उल्लंघन झाल्यास कंत्राटदारावर कारवाई

इमारतींना तडे, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींची दखल; मुंबई महापालिका व पोलिसांनी १५ दिवसांत नागरिकांची जनसुनावणी घेण्याचे निर्देश

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): दहिसर पूर्व जकात नाका येथे सुरू असलेल्या ट्रान्सपोर्ट हबच्या कामादरम्यान होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे परिसरातील इमारतींना तडे जाणे, ध्वनी प्रदूषण तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारींची पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गंभीर दखल घेतली आहे. यापूर्वी नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

ट्रान्सपोर्ट हबच्या कामासंदर्भात पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मनीषा चौधरी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्यासह पर्यावरण आणि पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ब्लास्टिंगच्या नियमभंगाची चौकशी

ब्लास्टिंग करणाऱ्या कंपनीचे यापूर्वी आयआयटीमार्फत परीक्षण करण्यात आले असून, त्यांच्या सूचनेनुसार नियंत्रित पद्धतीने ब्लास्टिंग करण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिकेने बैठकीत दिली.

मात्र, निर्धारित वेळा किंवा अन्य सुरक्षा अटींचे यापूर्वी उल्लंघन झाले असल्यास त्याची नोंद घेऊन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, असे शेलार यांनी सांगितले. तसेच अधिक सुरक्षित आणि प्रगत ब्लास्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही विचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट

ब्लास्टिंगमुळे इमारतींचे नुकसान झाल्याच्या तक्रारींची तज्ज्ञांमार्फत तपासणी करून स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तयार करावा, असे निर्देश देण्यात आले. ब्लास्टिंगमुळे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांकडून नुकसानभरपाईची कार्यवाही करावी, असेही शेलार यांनी सांगितले.

खनिज वाहतुकीचीही चौकशी

ट्रान्सपोर्ट हबच्या कामातून निघणाऱ्या खनिज आणि गौण खनिजाच्या वाहतुकीबाबत आवश्यक परवानग्या, रॉयल्टी आणि मानक कार्यपद्धतीचे पालन होत आहे का, याची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि मुंबई महानगरपालिकेने याबाबत चौकशी करून अहवाल सादर करावा, असे शेलार यांनी सांगितले.

१५ दिवसांत जनसुनावणी

ट्रान्सपोर्ट हबच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, धूळ, दुर्गंधी, ध्वनी प्रदूषण आणि ये-जा यासंदर्भात त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकल्प अभियंता आणि पोलिस विभागाने नागरिकांची जनसुनावणी घ्यावी आणि तिचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

विकासकामे आवश्यक असली तरी नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड सहन केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, असे शेलार यांनी सांगितले.

Key Points

  • दहिसर ट्रान्सपोर्ट हबच्या कामातील नियमभंग झाल्यास कंत्राटदारावर कारवाईचे आशिष शेलारांचे निर्देश,

  • ब्लास्टिंगमुळे इमारतींना तडे जाण्याच्या तक्रारींची तज्ज्ञांमार्फत तपासणी,

  • बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल तयार करण्याचे आदेश,

  • खनिज व गौण खनिज वाहतुकीतील परवानग्या, रॉयल्टी आणि नियमपालनाची चौकशी,

  • अधिक सुरक्षित व प्रगत ब्लास्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना,

  • नागरिकांच्या तक्रारींवर १५ दिवसांत जनसुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश,

  • वाहतूक कोंडी, धूळ, दुर्गंधी आणि ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना.