BMC Tendernama
मुंबई

बीएमसीच्या ९८० कोटींच्या टेंडरकडे कंत्राटदारांची पाठ; सातवेळा मुदतवाढ, तरी प्रतिसाद नाही

देवनार कत्तलखान्याच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प रखडला; दररोज २० हजार लिटर रक्ताची विल्हेवाट, प्रदूषण रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याची तयारी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबईतील सर्वात मोठ्या देवनार कत्तलखान्यातील वाढते प्रदूषण आणि दुर्गंधीवर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. दररोज प्राण्यांच्या कत्तलीमुळे वाहणाऱ्या तब्बल २० हजार लिटर रक्ताची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका आता अत्याधुनिक ब्लड ड्रॉइंग सिस्टीम आणि पीएनजी भट्टी उभारणार आहे. मात्र, आतापर्यंत तब्बल सात वेळा मुदतवाढ देऊनही या टेंडरकडे ठेकेदारांनी पाठ फिरवल्याने कत्तलखान्याचा कायापालट रखडला आहे.

देवनार कत्तलखान्यात दररोज सरासरी १ हजार शेळ्या-मेंढ्या, २२५ म्हशी आणि ५० ते १०० डुकरांची कत्तल केली जाते. यातून दररोज सुमारे २० हजार लिटर रक्त जमा होते. पूर्वी या रक्तातील सीरम काढून उरलेले रक्त बायोरेमिडिएशन प्लांट किंवा नाल्यांमध्ये जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी आणि जलप्रदूषण होत होते.

यावर उपाय म्हणून महापालिकेने रक्त सुकवण्याची यंत्रणा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे रक्तातील पाण्याचा अंश सुकवून त्याची पावडर तयार केली जाईल. या पावडरचा वापर सेंद्रिय खत आणि पशुखाद्य बनवण्यासाठी केला जाईल. यामुळे पूर्व उपनगरांतील वायू आणि जलप्रदूषण पूर्णपणे रोखण्यास मदत होईल.

कत्तलखान्यातील टाकाऊ घटकांची विल्हेवाट

लावण्यासाठी पूर्वी मोठ्या प्रमाणावर लाकडांचा वापर केला जात होता. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर आणि वायूप्रदूषण होत असे. आता लाकडाच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली असून, त्याऐवजी पीएनजीवर चालणारी अत्याधुनिक भस्मीकरण यंत्रणा बसवली जात आहे. यामुळे शून्य धूर निर्माण होऊन पर्यावरणाचा ऱ्हास टळेल आणि ऊर्जेचीही बचत होईल.

एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात असले तरी देवनार कत्तलखान्याच्या मूळ इमारतीचा आणि परिसराचा पुनर्विकास मात्र लाल फितीत अडकला आहे. २००८ मध्ये पहिल्यांदा पुनर्विकासाचा आराखडा तयार करून टेंडर काढण्यात आले, पण प्रतिसाद मिळाला नाही. २०१९ मध्ये दुसऱ्यांदा टेंडर काढण्यात आले. २०२२ मध्ये टर्नकी तत्त्वावर ९८० कोटींचा भव्य पुनर्विकास प्रकल्प जाहीर करण्यात आला. तसेच नोव्हेंबर २०२५ पर्यंत तब्बल सात वेळा मुदतवाढ देऊनही एकाही कंत्राटदार कंपनीने यात स्वारस्य दाखवलेले नाही.

देवनार कत्तलखाना अत्यंत जुना झाला असून, त्याच्या आधुनिकीकरणाची तातडीची गरज आहे. प्राण्यांना ठेवण्याची जागा आणि कत्तलखाना दोन्ही हायटेक करणे आवश्यक आहे.

Key Points

  • देवनार कत्तलखान्याच्या पुनर्विकासासाठी ९८० कोटींचा प्रकल्प

  • टेंडरला आतापर्यंत सात वेळा मुदतवाढ

  • एकाही कंत्राटदार कंपनीने स्वारस्य दाखवलेले नाही

  • देवनारमध्ये दररोज सुमारे २० हजार लिटर रक्त जमा होते

  • रक्त सुकवून पावडर तयार करण्याची यंत्रणा उभारण्याचे नियोजन

  • पावडरचा वापर सेंद्रिय खत आणि पशुखाद्यासाठी करण्याचे नियोजन

  • लाकडाऐवजी पीएनजीवर चालणारी भस्मीकरण यंत्रणा बसवण्याची तयारी

  • २००८ आणि २०१९ मध्येही पुनर्विकासासाठी टेंडर काढण्यात आले होते

  • २०२२ मध्ये टर्नकी तत्त्वावर ९८० कोटींचा पुनर्विकास प्रकल्प जाहीर

  • कत्तलखान्याच्या आधुनिकीकरणाची तातडीची गरज

वारंवार टेंडर काढूनही कोणतीही कंपनी पुढे येत नसल्याने आमची चिंता वाढली आहे.
डॉ. कलीमपाशा पठाण, देवनार पशुवधगृहाचे व्यवस्थापक