

मुंबई (Mumbai): मेट्रो मार्गिका-४च्या कामात कंत्राटदाराने दाखवलेल्या कमालीच्या बेजबाबदारपणामुळे मुलुंडमधील हवा प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे.
गेल्या आठवड्यात मुलुंडमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २८६ इतका धोकादायक नोंदवला गेला असून, याला सर्वस्वी मेट्रोचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गाचे रूपांतर अक्षरशः कचरा डेपोमध्ये झाले असून, येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा गंभीर आरोप स्थानिक आमदार मिहिर कोटेचा यांनी केला आहे.
मुलुंडमध्ये २७ नोव्हेंबर रोजी नोंदवल्या गेलेल्या ‘खराब’ हवेच्या गुणवत्तेमागील कारणांचा शोध घेतला असता, मेट्रो मार्गिका-४ च्या कामातून उडणारी धूळ आणि राडारोडा हेच प्रदूषणाचे मुख्य स्त्रोत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे एलबीएस मार्गावर गेल्या चार-पाच महिन्यांपासून भंगार, सिमेंट-काँक्रिटचे भलेमोठे ठोकळे, माती, रेती आणि इतर बांधकाम साहित्याचा कचरा तसाच पडून आहे. नियमानुसार हा राडारोडा तातडीने उचलणे आवश्यक असतानाही कंत्राटदाराने त्याकडे सोयीस्करपणे पाठ फिरवली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसर धुळीच्या लोटात हरवला आहे.
या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार मिहिर कोटेचा यांनी नुकतीच एमएमआरडीएचे अभियंते आणि महापालिकेच्या टी-विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत एलबीएस मार्गावरील सुमारे दोन किलोमीटर अंतराचा दौरा केला.
या पाहणीदरम्यान कंत्राटदाराचा भोंगळ कारभार उघडकीस आला. या अवघ्या दोन किलोमीटरच्या पट्ट्यात तब्बल १०० ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. अनेक ठिकाणी पदपथ पूर्णपणे उखडलेले असून बांधकामाचा कचरा, टाकून दिलेले लोखंडी साहित्य आणि भंगार रस्त्यावर विखुरलेले आहे. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी विद्युत खांबही धोकादायक अवस्थेत पडलेले दिसले, जे कंत्राटदाराच्या पूर्ण बेपर्वाईचे लक्षण आहे.
मेट्रोच्या कामामुळे पदपथ खोदले गेल्यास ते पूर्ववत करण्याची संपूर्ण जबाबदारी कंत्राटदाराची असते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी संरक्षक जाळ्या किंवा पत्रे (बॅरिकेडिंग) लावणे अनिवार्य आहे. मात्र, पाहणी केलेल्या ५० टक्क्यांहून अधिक ठिकाणी असे कोणतेही संरक्षक कठडे नसल्याचे निदर्शनास आले आहे.
डीबी एंटरप्राईझ या कंत्राटदाराला या कामासाठी ५०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष जागेवर स्वच्छता राखणे, राडारोडा उचलणे किंवा तोडलेले पदपथ दुरुस्त करणे यावर कंत्राटदाराने ५ कोटी रुपयेही खर्च केल्याचे दिसत नाही, असा संताप कोटेचा यांनी व्यक्त केला.
बांधकामातून उडणाऱ्या या धुळीचा फटका केवळ मानवी आरोग्यालाच नव्हे, तर पर्यावरणालाही बसत आहे. दुभाजकावरील झाडे आणि रोपे सिमेंटच्या धुळीने माखली असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी पुढील आठ दिवसांत संपूर्ण परिसर स्वच्छ करून पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिले आहे.