औरंगाबाद (Aurangabad) : सिडकोच्या (CIDCO) काळात लहानग्यांनी गजबजलेल्या नवीन औरंगाबादेतील शेकडो बालोद्यानांसह मोठी उद्याने आणि क्रीडांगणे, वाचनालये, सामाजिक सभागृहे, रस्ते, फूटपाथ यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या सर्व सार्वजनिक सुविधांचा पायाच खचला असून, अखेरच्या घटका मोजत असल्याने अनेक नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे करवसुलीत नवीन औरंगाबाद अव्वल नंबर असताना करदात्यांचा पैसा जातो कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिकेने सिद्धार्थ उद्यानात सुमारे ९० लाख रुपये खर्चून ‘सुपर हिरो’ पार्क उभारला. दुसरीकडे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी ८५ लाख रुपये खर्च करून विविध चौकात व्हर्टिकल गार्डन उभारले जात आहेत. मात्र नवीन औरंगाबादेतील सिडको-हडको, जयभवानी नगरातील जिजामाता काॅलनी व शिवाजीनगरासह बालोद्याने विकसित करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने बालकांचा सर्वांगीन शारिरिक विकास खुंटला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सिडकोने बरीचशी बालोद्यानांच्या आरक्षित जागा बड्या राजकीय आणि उद्योगपतींच्या घशात घातल्याची त्या त्या भागातील नागरिकांनी 'टेंडरनामा' प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
वाळुज-पंढरपूर आणि सातारासह चिकलठाणा एमआयडीसीत वाढत्या औद्योगिकरणामुळे आशिया खंडात सर्वांत वेगाने लोकसंख्येचा स्फोट होणाऱ्या औरंगाबादेत शहराचे शिल्पकार डाॅ. रफिक झकेरिया यांच्या प्रयत्नाने ३० ऑक्टोबर १९७२ रोजी नवीन औरंगाबाद प्रकल्पासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकल्पांतर्गत सिडकोने एकूण १०१२ हेक्टर जमिनीवर सिडकोतर्फे २१ हजार १२ घरे बांधण्यात आली होती. यात प्रत्येक सेक्टर मध्ये उद्याने, क्रीडांगणे आणि चिमुकल्यांसाठी स्वतंत्र बालोद्यानांसाठी जागा विकसित करण्यावरही भर देण्यात आला होता. सोबतच सामाजिक सभागृहे, वाचनालये देखील उभारली होती. मात्र पुढे १ एप्रिल २००६ रोजी सिडको - हडकोसह नवीन औरंगाबादचे महानगरपालिकेस हस्तांतरण करण्यात आले आणि सारेच वाटोळे झाले. महापालिकेने येथील रहिवाशांकडून अव्वाच्या सव्वा कर लावला मात्र सुविधांच्या नावाने सर्वत्र बोंबाबोंब आहे.
पाच वर्षांपासून नाट्यगृह कुलूपबंद
सिडकोतर्फे एन - ५ गुलमोहर काॅलनीत ७८३२ चौ.मी. क्षेत्रावर चार कोटी रूपये खर्च करून अत्याधुनिक तंत्रज्ञानावार आधारित नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली. द्विस्तरीय ११०० आसन क्षमता असलेल्या नाटगृहात ५३० चौ.मी.चे भव्य प्रदर्शन केंद्र देखील उभारण्यात आले होते. विशेष म्हणजे फ्री स्टॅंडिंग ग्रॅन्ड स्टेअरकेस यांचा समावेश असलेल्या या नाट्यगृहाचे उद्घाटन २१ नोव्हेंबर, २००८ रोजी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र १६ एप्रिल २०१८ रोजी हे नाट्यगृह औरंगाबाद महानगरपालिकेत सुपूर्द करण्यात आले. आज या नाट्यगृहातील विद्युतीकरण, खुर्च्या आणि रंगमंच होत्याचे नव्हते झाले आहे. गत पाच वर्षापासून दुरूस्तीअभावी नाट्यगृहाला ताला लागलेला आहे.
सिडकोच्या काळातील पायाभूत सुविधांचा खचला पाया
तत्कालीन सिडकोने लहान्यांसह मोठ्यांची शिवाय आजी आजोबांची गरज ओळखून येथील एन - १ ते एन - १३ येथील प्रत्येक सेक्टरमध्ये बालोद्यान, भव्य सार्वजनिक उद्याने, क्रिडांगणे, नाना - नानी पार्क, सामाजिक सभागृहे बनविण्यात आले होते. त्यानंतर सिडकोचे रुपांतर पालिकेत झाले आणि आयुक्तांची नेमणूक झाली. दरम्यानच्या काळात तत्कालीन सिडकोने तयार केलेल्या सर्वच सार्वजनिक सुविधांकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले.
नवीन औरंगाबादकरांच्या आशेवर पाणी....
महापालिकेत हे नवीन औरंगाबाद प्रस्थापित झाल्यावर या सर्व उद्यानांना आणि क्रिडांगणांसह सामाजिक सभागृह, नाट्यगृहाला नवी झळाळी येईल अशी अपेक्षा होती. मात्र सर्वट सुविधांची माती झाली. उद्यानातील सी-सॉ, गेट व बाकडे तुटले आहेत. तारेचे कुंपण अनेक ठिकाणी मोडले आहे. त्यामुळे येथे गुरांचे वास्तव्य असते. येथील झाडे व गवत कोमेजून गेली आहेत. फरशांची दुरावस्था झाली आहे. आजूबाजूला वाहने पार्क केलेली असतात. परिणामी लहानग्यांना खेळण्यासाठी आणि मोठ्यांना बागडण्यासाठी हक्काचे ठिकाण नसल्याने त्यांचा प्रचंड हिरमोड होत आहे. यातील बहूतांश उद्याने, बालोद्याने आणि क्रिडांगणे आणि वाचनालयाच्या आरक्षित जागा देखील सिडकोने विकसित न करता धनधांडग्यांच्या घशात ओतल्याचे समोर आले आहे.
एकाच उद्यानात कोट्यवधींचा खर्च
लहान मुलांसाठी आकर्षणाचे केंद्र म्हणून वर्षभरापूर्वी महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात ‘सुपर हिरो’ पार्क उभारला होता. सुमारे ९० लाख रुपये खर्चून येथे छोटा भीम, बाल हनुमान, शक्तीमान, बॅटमॅन, थॅनॉस, हल्क यासारख्या सुपर हिरोंचे मोठमोठे पुतळे बसविण्यात आले. दुसरीकडे शहरातील काही चौकात व नाल्याकाठी ८५ लाख रूपये खर्च करून व्हर्टीकल गार्डनची संकल्पना राबवने सुरू आहे. मात्र नवीन औरंगाबादेतील उद्यानांच्या दुरावस्थेकडे महापालिका केव्हा लक्ष देणार असा सवाल उपस्थित होत आहे.