PCMC Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : सुशोभीकरणावर पीसीएमसीने केलेला लाखोंचा खर्च का गेला वाया?

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : महापालिकेने चिंचवड लिंक रस्त्याच्या कडेवर लावलेल्या झाडांच्या फांद्या दिशादर्शक फलकांच्या अवतीभवती वाढू लागल्यामुळे येथील बहुतांश फलक हे अदृश्य झाले आहेत. याची देखभाल दुरुस्ती करण्यात महापालिका ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय प्रशासन कमी पडत असून, आजपर्यंत सुशोभीकरण या कामावर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड गावात जाण्यासाठी रस्त्याचे जाळे तयार केले आहे. त्यापैकी पिंपरी कॅम्प येथून चिंचवड येथे जाण्यासाठी लिंक रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडेवर सुशोभीकरण करण्यासाठी शोभेची झाडे लावली आहेत. वाहनचालक व नागरिकांना अंतर्गत भागात जाण्यासाठी परिसराची ओळख व्हावी म्हणून दिशादर्शक फलक लावले आहेत.

इंद्रप्रस्थ सोसायटी, नो पार्किंग, माणिक कॉलनी, सिद्धार्थ अपार्टमेंट एवढेच नाही, तर ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाकडे जाण्यासाठी दिशा दर्शविणारा फलक देखील येथे लावण्यात आला आहे.

हे दिशादर्शक फलक स्पष्टपणे नजरेस पडतील, अशा ठिकाणी लावणे अपेक्षित असताना ते झाडांच्या बुंध्याजवळ लावले. ठेकेदाराकडून हे काम करून घेताना ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता व उपअभियंता यांच्याकडून दूरदृष्टीचा अभाव झाल्याचे दिसते.

आता झाडांच्या फांद्या फलकांवर वाढत आल्यामुळे फलक अदृश्य झाले आहेत. याचा नागरिकांना व वाहनचालकांना कसलाही फायदा होत नसल्याचे चित्र आहे. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आठ दिवसांपूर्वी दिशादर्शक फलक आणि विजेच्या दिव्यांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याबाबत अधिकाऱ्यांना कळवले. दोन दिवसांत काढून घेतो म्हणून सांगितले होते.

- शीतल शिंदे, माजी नगरसेवक

प्रत्यक्ष ठिकाणाला उद्या भेट देऊन पाहणी करण्यात येईल. झाडांच्या फांद्या दिशादर्शक फलकांवर आल्या असतील तर त्याची प्राधान्याने छाटणी केली जाईल.

- उमेश ढाकणे, सहायक आयुक्त, उद्यान विभाग