
चऱ्होली (Charholi) : चऱ्होलीतून पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी अलंकापुरम रस्ता हा महत्त्वाचा आहे. परंतु त्याचे काम ठिकठिकाणी रखडले आहे. या अरुंद रस्त्यावरून अवजड वाहतूक होत असल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडून त्याची दुरवस्था झाली आहे. याशिवाय अनेक धोकादायक वळणेही आहेत. त्यामुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
हा रस्ता रुंद करुन त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत. याशिवाय रोजचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून चऱ्होलीकडे पाहिले जाते. या भागांत नागरी वस्ती वाढत आहे. त्यामुळे चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी, काळजेवाडी आदी भागांत मोठ्या प्रमाणावर सोसायटी, घरे निर्माण होत आहेत. परंतु वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या बघता अलंकापुरम रस्ता रहदारीसाठी कमी पडत आहे.
या अरुंद रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर भोसरी एमआयडीसी, चिंचवड एमआयडीसी तसेच नाशिक-पुणे महामार्गावरील प्रवास करणारी अवजड वाहने ये-जा करतात. त्यामुळे स्थानिक नोकरदार वर्गांना दररोज मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
उसाच्या ट्रॅक्टरचीही भर
श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याला मरकळ, आळंदी, चऱ्होली, शिक्रापूर आदी परिसरातील ऊस जातो. त्याची वाहतूक अलंकापूर रस्त्याने होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त ऊस ट्रॅक्टर चालक भरत आहेत. अलंकापुर रस्ता अरुंद व धोकादायक वळणांचा तसेच चढ-उताराचा असल्याने ट्रॅक्टर चालक संथगतीने प्रवास करतात.
बराच वेळा चढाच्या ठिकाणी ट्रॅक्टरची चाके जाग्यावर फिरतात. त्यामुळे रस्ता उखडून आतील खडी व दगड रस्त्यावर पसरत आहेत. या खड्ड्यातून दुचाकी चालकांना प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. यामुळे अवजड वाहनांसह ऊस वाहतूक या रस्त्यावरून थांबवणे गरजेचे आहे.
काय आहे परिस्थिती ?
- अलंकापुरम रस्ता ठिकठिकाणी अरुंद
- अनेक ठिकाणी धोकादायक वळणे
- अवजड व लांबलचक वाहनांकडून रस्त्याचा वापर
- दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी रस्ता अपुरा
- अलंकापुरम सोसायटीच्यापुढे डोंगर भागात धोकादायक वळणे
- समोरुन येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही
- अनेक वेळा येथे लहान-मोठे अपघात होण्याचे प्रकार
तापकीर चौक ते वडमुखवाडी मार्गे गणेश साम्राज्य चौक हा रस्ता चऱ्होली आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्याचे काही कामही पूर्ण झाले आहे. तर काही ठिकाणी अपूर्ण राहिले आहे. महापालिका प्रशासनाने स्थानिक नागरिकांना व जागा मालकांना विश्वासात घेऊन या रस्त्याचा मार्ग मोकळा करावा. हा रस्ता झाल्याने वाहतुकीचा प्रश्न सुटणार असून दररोजचे होणारे अपघात टळण्यास मदत होणार आहे.
- अनिकेत तापकीर, सामाजिक कार्यकर्ते, चऱ्होली
जय गणेश साम्राज्य चौक ते वडमुखवाडीकडे जाणारा रस्ता विकास आराखड्या बाहेरील (नॉन डीपी) असल्याने त्याचे रुंदीकरण करता येत नाही. तसेच तापकीर चौक ते वडमुखवाडीकडे जाणारा रस्ता बीआरटीएसकडे आहे. त्याचे पूर्ण भूसंपादन झाले नाही. महापालिकेच्या नगररचना विभागाकडून भूसंपादनाविषयी कामकाज सुरू आहे. ते पूर्ण झाल्यास या रस्त्याचा मार्ग मोकळा होईल.
- अमित चव्हाण, कार्यकारी अभियंता, ई क्षेत्रीय कार्यालय
जय गणेश साम्राज्य चौक ते वडमुखवाडीकडे जाणारी वाहतूक एकेरी करण्याचे नियोजन सुरू आहे. जय गणेश साम्राज्य चौकातून कचरा डेपोकडे जाणाऱ्या मार्गाने वडमुखवाडीकडे जाता येईल. तर चऱ्होली, वडमुखवाडी कडून येणारी वाहतूक थेट जय गणेश साम्राज्य चौकाकडे सुरू ठेवण्यात येईल. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास तात्पुरती मदत होईल.
- दीपक साळुंखे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, भोसरी