छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : आधीच परिसरात आठ दिवसाआड पाणी त्यात डेग्यू संसर्गासह शहरात साथरोगांचा जोर वाढत असताना आणि सरकारी रूग्णालयात औषधांचा तुटवडा आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असताना छत्रपती संभाजीनगरातील सिडको एन-दोन भागातील विनय काॅलनी या उच्चभ्रू वसाहतीतील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांना पोट बिघडणे, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे परिसरातील नागरिकांनी तक्रारी करूनही महापालिकेला दूषित पाण्याचा स्त्रोत सापडत नसल्याचे म्हणत आता काय करू, असा प्रती सवाल करत अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. महापालिकेतील बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने नियमित पाणीपट्टी व मालमत्ताकर भरणाऱ्या नागरीकांना पिण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा तर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी खाजगी टँकरचा आधार घ्यावा लागत असल्याने पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागत आहे.
सिडको एन-दोन विनय काॅलनीही जवळपास एक हजार लोकांची वसाहत आहे. संध्या या उच्चभ्रू वस्तींमधील रहिवाशांचा बाटलीबंद पाणी खरेदीकडे जास्त ओढा आहे. ज्यांच्या घरात लहान मुले आहेत, त्यांच्या घरात तर बाटलीबंदच पाणी वापरले जात आहे. परिसरातील पाणी विक्रेत्यांकडे दहा लिटर, वीस लिटर असे मोठे कॅन खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या पाण्यासाठी देखील टँकर बोलवावे लागत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून नागरीकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. आणखी किती दिवस असे पाणी येईल हे महापालिकेचे अधिकारी कनिष्ठ अभियंता कल्याण सातपुते, वार्ड अभियंता एस. एस. पाटील व उप अभियंता मधुकर चौधरी यांना देखील माहीत नाही, त्यामुळे नियमित पाणीपट्टी भरणार्यांना खाजगी पाणी विक्रेत्यांकडून पिण्यासाठी बाटलीबंद पाणी खरेदी करावी लागत आहे. तर सांडपाण्यासाठी टँकर बोलवावे लागत आहेत. याभागातील जागृक कुटुंबीयांनी सांगितले गढूळ पाणी पिऊन प्रकृती बिघडल्यास डॉक्टरला पैसे देण्याऐवजी ते बाटलीबंद पाण्यासाठी दिलेले बरे, असे नागरिक म्हणाले. या भागातील बाटलीबंद पाण्याची मागणी वाढल्याने विक्रेत्यांची चांदी होत आहे. मात्र महापालिकेला सर्व कर नियमित भरणाऱ्या नागरीकांचा खिसा रिता होत आहे.
हे कॅबिनेटमंत्री जबाबदार
टेंडरनामा प्रतिनिधीने या भागात फेरफटका मारला. दूषित पाण्याची कारणे शोधली, त्यात विनय काॅलनीच्या शेजारीच असलेल्या महाजन काॅलनीची ड्रेनेजलाईन बंद पडली होती. येथील त्रस्त नागरीकांची समंस्या सोडविण्यासाठी आमदार अतुल सावे यांनी मंध्यस्थी करत थेट महाजन काॅलनीची ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी कोट्यावधीचा सिमेंट रस्ता फोडून विनय काॅलनीच्या दिशेने असलेल्या ड्रेनेजलाईनला जोडण्यात आल्याचे येथील नागरीकांनी सांगितले.
ठेकेदाराचे निकृष्ट काम
हे काम एका खाजगी ठेकेदारामार्फत करण्यात आले. त्याने विनय काॅलनीला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीवरच मल: निसारण वाहिनीचे चेंबर बांधून जलवाहिनीवरच ड्रेनेजलाईन टाकली. चेंबर बांधताना त्याला कसलेही प्लाॅस्टर केले नाही. ड्रेनेजलाईन व चेंबरचे काम अंत्यंत निकृष्ट झाल्याने ड्रेनेजलाईनला गळती लागून दूषित पाणी जलवाहिनीत शिरल्याने नागरीकांना गत दोन महिन्यापासून दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक म्हणजे खोदलेल्या कोट्यावधीच्या रस्त्याची देखील दुरूस्ती केली नाही. त्यामुळे एकीकडे दूषित पाणी तर दूसरीकडे अपघाताची दाटीवाटी करून ठेवली.
काय म्हणाले महापालिकेचे अधिकारी
यासंदर्भात प्रतिनिधीने महापालिकेतील अधिकाऱ्यांना विचारले असता हे काम आमदार तथा कॅबिनेट राज्यमंत्री अतुल सावेंच्या आदेशाने करण्यात आले आहे, त्या कामाला महापालिकेची कुठलीही परवानगी नाही. विनय काॅलनीतील नागरिकांनी तक्रारी केल्यावर आम्ही जलवाहिनी दुरूस्तीसाठी खोदकाम केले तेव्हा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या लाईनवर ड्रेनेजचे चेंबर व ड्रेनेजलाईन टाकण्यात आल्याचे लक्षात आले. त्यानंतर महापालिकेच्या अंत्यावश्यक देखभाल दुरूस्ती योजनेतून तातडीने दूरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. जमिनीच्या सहा ते सात फूट खोदकाम करून ड्रेनेजलाईन काढावी लागली. चेंबर काढून बारा फूट अंतरावर दूसरीकडे स्थलांतरीत करावे लागले. यादरम्यान चूकीच्या पद्धतीने जलवाहिनीवर ड्रेनेजलाईन व चेंबर बांधल्याने जलवाहिन्यांमध्ये काही प्रमाणात माती आणि गाळ व दूषित पाणी शिरल्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही ही शक्यता लक्षात घेऊन इतर उपाययोजना करत आहोत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र प्रत्यक्षात अधिकाऱ्यांचे नागरीकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या या अतीगंभीर प्रश्नाकडे अजिबात लक्ष नसल्याचा आरोप मनोज बोरा (मामाजी) भूषण कोळी, अरून अरणकल्ले यांच्यासह सर्वच नागरीकांनी केला आहे.