Sambhajinagar : पुढाऱ्यांचे धार्मिक स्थळाच्या वाटेकडे दुर्लक्ष; रस्त्याची वाट

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : फुलंब्री मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५१ ए ते दमनी वाहेगाव देवमुनेश्वर संस्थानला जोडणारा एक किलोमीटरचा जो रस्ता आहे तो गेल्या पंधरा वर्षांपासून खराब असल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच देवमुनेश्वर संस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे, याच रस्त्यावर आसपासच्या शेक्टा व दमणी वाहेगाव हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी असून, या रस्त्यावर वरून शेतमाल व गुराढोरांना चारा ने आण करणारी वाहने याच रस्त्याने ये-जा करतात, त्याचबरोबर याच मार्गावर देवमुनेश्वर संस्थानातील विठ्ठल रखुमाई, महादेव व गणपती मंदीर प्रसिध्द असल्याने छत्रपती संभाजीनगरासह  आसपासच्या पंचक्रोशीतील भाविकांची येथे दर्शनासाठी मोठी गर्दी असते. राज्यभरातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. तसेच या रस्त्यावर येणारी जी गावे आहेत त्यांना गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यावरून ये-जा करताना शेतकऱ्यांसह नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Sambhajinagar
मुंबईतील विकास प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार लागले कामाला

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ ए पासून देवमुनेश्वर संस्थानपर्यंत हा रस्ता असून, याची लांबी एक किलोमीटरपेक्षा कमी आहे. सद्यःस्थितीत सदर रस्ता हा सिमेंटचा आहे. माजी आमदार डाॅ. कल्याण काळे यांच्या काळात १५ वर्षांपूर्वी रस्त्याचे काम करण्यात आले होते. सदर रस्ता हा सद्यस्थितीत खराब झालेला आहे, हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी विशेष रस्ता दुरुस्ती कार्यक्रमांमध्ये सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता, या भागातील बऱ्याच रस्त्यांची कामे मंजूर  झाली आहेत. त्यात या रस्त्याचाही समावेश असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून हेच उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत असल्याचे सांगत गावकऱ्यांनी अविश्वास दाखवला आहे.

Sambhajinagar
Mumbai : उपनगरात झोपड्पट्टीवासीयांसाठी नव्याने 12000 स्वच्छतागृहे; 628 कोटींची...

खराब रस्त्यामुळे शेतकरी, नागरिक तसेच भाविकांना याचा फार त्रास होतो. दुभंगलेल्या सिमेंट रस्त्यात टायर अडकून वाहने घसरून पडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पण, या रस्त्याची दुरावस्था काही नीट होताना दिसत नाही. हा रस्ता पार करताना अनेकांना कमरेचा त्रास सुद्धा होत आहे. येता-जाताना तर खूप त्रास होत आहे. पाऊस पडल्यावर तर गाडी चालवता येत नाही. नागरिक व शेतकऱ्यांसह भाविकांना येता जाताना खूप रस्त्याचा त्रास होतो. छत्रपती संभाजीनगरपासून ३२ किलोमीटर अंतर गाठत टेंडरनामा प्रतिनिधीने गावकऱ्यांसह देमणी वाहेगाव येथील देवमुनेश्वर संस्थानकडे जाणाऱ्या या रस्त्याची पाहणी केली. दरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व खासदार रावसाहेब दानवे तसेच आमदार हरिभाऊ बागडे नाना यांना या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत अनेक वेळा सांगितलं पण कोणीच दुरुस्ती करत नाही. या रस्त्यासाठी आम्ही कोणाकडे जायचं कोणाकडे या रस्त्याची दाद मागायची, आम्हाला रोज यावं लागतं... आमच्या शेतामध्ये पिकलेलं अन्नधान्य आम्हाला आणण्यासाठीही या रस्त्याने यावं लागतं त्यामुळे याचा खूप त्रास होतो, आम्हाला ते वाहून न्यावं लागतं... रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आम्ही ते कसं वाहून न्यावं आमची एवढीच मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, असे दमणी वाहेगावातील नागरीकांनी सांगितले. अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या या रस्त्याकडे पुढाऱ्यांचे अजिबात लक्ष नाही. त्यांनी याकडे लक्ष द्यावं व हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी कैफियत नागरिकांनी मांडली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com