गडचिरोली (Gadchiroli) : मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे वाक्य वाहनांच्या मागील बाजूला, रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट फलकावर किंवा लोखंडी बोर्डावर लिहिलेले असते; तरी पण ते वाचूनही मागील चालक काही बोध घेत नसेल तर त्याचे वाहन सुरक्षित राहणार तरी कसे? अपघाताला आमंत्रण तर मिळणारच. अशीच स्थिती आरमोरी शहराच्या मुख्य चौकाची झाली आहे. सुसाट हाकणाऱ्या वाहनांना लगाम घालण्यासाठी मुख्य चौकात गतिरोधक नसल्याने व आधीच रस्ता अरुंद असल्याने जीवघेण्या गतीला आवरवणार कोण, असा सवाल नागरिकांचा आहे.
राष्ट्रीय महामार्ग 2017 रोजी घोषित झाला, तर तीन ते चार वर्षांपूर्वी आरमोरी बर्डीपर्यंत बांधकाम पूर्ण झाले. शहरात तहसील कार्यालय ते देसाईगंज टी- पॉइंट, नवीन बसस्थानक, शक्तीनगर टी-पॉइंट, पंचायत समिती, भगतसिंग चौक, जुना बसस्थानक, इंदिरा गांधी चौक, साई मंदिर आदी सर्व वर्दळीचे ठिकाण असून सर्व दुकान, मार्केट लाइन रस्त्यावर आहे. वर्दळीच्या मार्गावर व शहरातील मुख्य मार्गावर एकही गतिरोधक निर्माण करण्यात आलेले नाही. यामुळे देसाईगंज टी-पॉइंट ते इंदिरा गांधी चौक, साई मंदिर चौकापर्यंतच्या मार्गावर आठवड्यातून एक तरी अपघात घडतो. अत्यंत वर्दळीच्या या मार्गावर वाहनांची गती अधिक राहत असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. या मार्गावर असलेल्या प्रमुख आठ चौकांत गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी अनेकदा या नागरिकांनी केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. रस्त्याच्या दुतर्फा दुकाने असल्याने समोर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे रहदारीला मर्यादा येते. अनेक किरकोळ अपघात नेहमीच होत असतात.
अवजड वाहनांची तपासणीच होत नाही :
शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांची तपासणी होत नाही, वाहनात क्षमतेपेक्षा जादा माल आहे का, याचीही पाहणी होत नाही. अवजड वाहनांच्या मालकांच्या सांगण्यावरूनही पोलिसांना या पकडलेल्या गाड्या सोडून द्याव्या लागतात, अशी माहिती आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुसाट वेगाने वाहने शहरातून धावतात.
ही ठिकाणे बनली अपघातप्रवण स्थळे :
येथील महात्मा गांधी महाविद्यालयात, पंचायत समिती चौक, भगतसिंग चौक, जुना बसस्थानक ही स्थळे तर अपघातप्रवण घोषित करण्याची स्थिती आहे. चारही बाजूंनी वाहने समोरासमोर येत असून गती अधिक राहत असल्याने अपघात घडतात. रस्ता ओलांडताना वृद्धांची फारच तारांबळ उडते. या वाहनांच्या गतीला वेळीच आवर घालण्यासाठी गतिरोधक उभारणे आवश्यक आहे, अन्यथा जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला राष्ट्रीय महामार्ग निर्माण होणे गरजेचे आहे. तेव्हाच शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागेल. यातच वाहनांच्या गतीवर वाहतूक पोलिसांनी नियंत्रण मिळविण्यासाठी कारवाई करावी. तेव्हाच अपघाताच्या किरकोळ घटना होणार नाहीत. अशी प्रतिक्रिया आरमोरी नागरिक चंदू वडपल्लीवार यांनी दिली.
बायपास मार्गाची गरज :
साई मंदिर ते शक्तीनगर टी- पॉइंटपर्यंत अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. येथून सुरू असलेल्या वाहनांच्या वर्दळीमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे अवजड वाहनाला बायपास रस्ता करण्याची गरज आहे. शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनामुळे शहरातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. यावर उपाययोजनांची गरज आहे.