
नागपूर (Nagpur) : रामटेक शहराच्या अंबाळा येथे रामटेक विकास तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत नाली बांधकाम करण्यात येत आहे. पण अनेक दिवसांपासून काम बंद असल्याने व नालीचे काम अर्धवट असल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.
तेली समाज धर्मशाळेकडून कुणबी समाज धर्मशाळेकडे जाणाऱ्या मार्गावर पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे या मार्गाने वाहनांचे येणे-जाणे बंद आहे. दुसरा मार्ग तेली समाज धर्मशाळेकडून गोटू महाराज ते कुणबी समाज धर्मशाळेकडे जाणाऱ्या मार्गावरीले नालीचे काम अर्धवट आहे. रोड खचलेला आहे. येथे केव्हाही रोड खचून मोठा अपघात होऊ शकतो. काम अर्धवट असल्याने सांडपाण्याच्या पाण्याने नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत. त्यामुळे मच्छर व पाण्याचे घाण दुर्गंधीमुळे अंबाळावासी त्रस्त आहेत. गोटू महाराज धनकर यांनी नालीच्या अर्धवट बांधनामुळे अनेक अपघात झाले असल्याचे सांगितले. तेली समाज धर्मशाळेजवळ नाली बांधकामसाठी मोठा खड्डा खोदला आहे. परंतु तिथेही काम पूर्ण झाले नाही. काम त्वरित सुरू करण्याची मागणी अंबाळा येथील नागरिकांनी केली आहे.
काय म्हणतो सा.बां. विभाग
नालीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत केले जात आहे. विभागाचे अभियंता सुनिल दमाहे म्हणाले की या वर्षी जोरदार पावसामुळे अंबाळा तलाव तुडंब भरलेला आहे. नगर परिषद रामटेकला अंबाळा तलावाचे दोन मिटर पाणी कमी करण्यास सांगितले आहे. पाणी कमी झाले की पूर्ववत नाली बांधकामाला सुरुवात होईल. अधुरे बांधकाम असल्याने अंबाळा गावातील दुषित पाणी थेट तलावात जात आहे. तसेच पाणीपातळी वाढल्याने अंबाळा तलाव काठावरील अनेक मंदिर दोन ते तीन फुट पाण्यात बुडाली आहेत. वास्तविक पुरातत्त्व विभागाने पाणी कमी करण्यासाठी पुढाकार घेणे हवे होते. पण पुरातत्व विभाग दुर्लक्ष करीत आहे.