
नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेमार्फत मागील तीन वर्षात रस्त्यांच्या कामांकरिता ४८९.७२ कोटी रुपये खर्च करण्यात आला. या कामांचा निकृष्ट दर्जा यंदाच्या पावसाळ्यात उघडकीस आला. याबाबत सर्वथरातून महापालिकेवर टीका होत असताना नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही रस्त्यांच्या दर्जाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेकडून होणोऱ्या बांधकामांच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने त्रयस्थ संस्था नेमणुकीची प्रक्रिया नाशिक महापालिकेमार्फत सुरू असल्याची माहिती लेखी उत्तरात दिली.
नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील रस्त्याच्या कामांची गुणवत्तेचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक महानगरपालिकेने गेल्या अडीच वर्षात रस्त्यांच्या कामासाठी सुमारे साडेसहाशे कोटी रुपये खर्च करून देखील पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडले. यामुळे विविध संघटनांकडून आंदोलने करण्यात आली आहेत. नाशिक शहरातील रस्त्याच्या कामांची गुणवत्ता दर्जाहीन असल्याबाबत नाशिक महानगरपालिकेला असंख्य तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या रस्त्याच्या कामांची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी बांधकाम विभागासह गुणवत्ता नियंत्रण विभागाची असल्यामुळे शासनाने या तक्रारींची चौकशी केली आहे काय, असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला होता.
नाशिक शहरातील रस्त्यांच्या दर्जाबाबत माजी महापौर दशरथ पाटील यांनीही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे नाशिकचा प्रश्न न्यायालयाबरोबरच विधिमंडळातही पोहोचला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडल्यामुळे विविध संघटनांकडून महानगरपालिकेस निवेदने प्राप्त झाली असून, याबाबत आंदोलने करण्यात आली ही बाब खरी आहे. नाशिक महानगरपालिकेमार्फत मागील तीन वर्षात रस्त्यांच्या कामांकरिता ४८९.७२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
नाशिक शहरामध्ये सद्यस्थितीत भुयारी गटारींची कामे, पाणीपुरवठ्याची कामे, महानगर गॅस लिमिटेडची भूमीगत गॅस पाईपलाईन, रिलायन्स, एअरटेल, जिओ फायबर इत्यादी कंपन्यांचे केबल नेटवर्किंगची कामे यामुळे अनेक रस्त्यांवर खोदकामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे महानगरपालिका हद्दीत स्मार्ट सिटी अंतर्गत सुद्धा अनेक विकास कामे सुरू आहेत. यामुळे रस्त्यांवर होणाऱ्या खोदकामांमुळे नागरिकांच्या तक्रारी व निवेदने महानगरपालिकेस प्राप्त झालेली आहेत. नाशिक महानगरपालिकेमार्फत रस्त्यांची कामे करताना कामे गुणवत्तापुर्वक होण्याच्या दृष्टीने पुरेपुर दक्षता घेण्यात येते. तसेच, बांधकामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत शासकीय तंत्रनिकेतन, नाशिक या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कामांचे गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने त्रयस्थ संस्था नेमणुकीची प्रक्रिया महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.