
नाशिक (Nashik) : सिन्नर (Sinnar) तालुक्यात मागील आठड्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे पाच सहा गावांमधील 12 ते पंधरा रस्ते वाहून गेले. यातील बहुतांश रस्ते नॉन प्लॅन असून ते आमदार, खासदार स्थानिक विकास निधीतून जिल्हा परिषद यंत्रणेने तयार केले आहेत. यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती कोणी करायची, असा नवा पेच निर्माण झाला आहे.
सिन्नर तालुक्यात मागील आठवड्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला यात प्रामुख्याने सोनाबे, सोनारी, वडगाव, दक्षिण भागात चोंढी, मेंढी या गावांमध्ये बंधारे फुटणे, शेत वाहून जाणे आणि रस्ते वाहून जाणे हे प्रकार घडले आहेत. या नुकसानीचे संबंधित विभागांकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. नुकसानीत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांच्या रस्त्यांचे काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाले आहे. या ढगफुटीत अनेक रस्त्यांचे नुकसान झाले असून ते जिल्हा परिषद यंत्रणेने तयार केले आहेत. यामुळे हे रस्ते जिल्हा परिषदेचे असल्याचे समजून स्थानिकांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला याबाबत माहिती दिली. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्यांची पाहणी केली असता हे रस्ते जिल्हा परिषदेने बांधले असते तरी ते रस्ते ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग व राज्य मार्ग या प्रकारातील नाहीत. यामुळे हे रस्ते दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेची नसल्याचे सांगितले जात आहेत. हे रस्ते प्रामुख्याने नॉन प्लॅन असून ते आमदार, खासदार निधी, डोंगर क्षेत्र विकास निधी व जिल्हापरिषद सेस निधीतून तयार केले आहेत. या नादुरुस्त रस्त्यांचा अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे. मात्र, या रस्त्यांची जबाबदारी आपली नसल्याचे सांगून जिल्हा परिषदेने जबाबदारी झटकल्याचे दिसत आहे.
पाझर तलाव कोणाचे?
सिन्नर हा दुष्काळी तालुका असून, 1972 मध्ये रोजगार हमी योजनेतून अनेक पाझर तलाव बांधले आहेत. अशाच एका पाझर तलावाचे या पावसात नुकसान झाले असून त्याच्या भिंतीला तडे गेल्याने तो बंधारा कधीही फुटण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील विरोधी पक्षाचे नेते, मंत्री त्या पाझर तलावास भेटी देत आहेत. मात्र, पाझर तलावाची कागदपत्र कोणत्याही विभागाकडे मिळत नाहीत. यामुळे हा पाझर तलाव प्रादेशिक जलसंधारण, जिल्हा परिषद जलसंधारण की पाटबंधारे विभाग यापैकी नेमका कोणत्या विभागाने बांधला आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
समृद्धीने केली बरबादी
समृद्धी महामार्गावर पडलेले पावसाचे पाणी थेट लगतच्या शेतात काढून देण्यात आले आहे. सोनआंबे येथे समृद्धी लगतचे एकर भर टोमॅटो शेत त्या पाण्याने वाहून गेले आहे. यामुळे या समृद्धी महामार्गाने शेतकऱ्यांची बरबादी होत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.