Mumbai : 'BKC'तील 3 हजार कोटींच्या भूखंडांसाठी टेंडर
मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) वांद्रे-कुर्ला संकुलातील सुमारे १४ हजार चौरस मीटरचे भूखंड विक्रीला काढले आहेत. ८० वर्षांसाठी २ भूखंड भाडेतत्वावर देण्यात येणार असून याद्वारे सुमारे ३ हजार कोटींची गंगाजळी 'एमएमआरडीए'च्या तिजोरीत जमा होणार असल्याचा अंदाज आहे. या भूखंडांसाठी १७ जुलैपर्यंत टेंडर भरता येणार आहे.
मुंबई आणि परिसरात 'एमएमआरडीए'ने गेल्या काही वर्षात मोठं मोठे प्रकल्प सुरू केले आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावे आणि वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्राधिकरणाचा निधी उभारण्यावर भर आहे. त्यामुळे बीकेसीतील सुमारे १४ हजार चौरस मीटर जागा व्यावसायिक वापरासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय 'एमएमआरडीए'ने घेतला आहे. बीकेसीतील ई आणि जी ब्लॉकमधील जमीन 'एमएमआरडीए'च्या मालकीची आहे. या दोन ब्लॉकमध्ये मिळून वाणिज्य वापराचे ११३ भूखंड, रहिवासी वापराचे ३४ भूखंड आणि सामाजिक सुविधांसाठीचे २० भूखंड आहेत.
'एमएमआरडीए'ने बीकेसीतील सी १३ आणि सी १९ डी या २ व्यावसायिक वापराच्या भूखंडाना भाडेतत्वावर देण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. सी १३ भूखंड ७ हजार ७१ चौरस मीटरचा असून ४५ हजार क्षेत्रावर बांधकाम करण्याची परवानगी आहे. सी १३ साठी १५५० हजार कोटी इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तर सी १९ डी साठी १३७८ कोटी इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. याहून अधिक बोली लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यापुढे सी १९ डी भूखंड ६ हजार ९६ चौरस मीटरचा असून ४० हजार चौरस मीटर बांधकाम क्षेत्रफळाचा आहे. या दोन्ही भूखंडांसाठी प्रत्येकी चौरस मीटरमागे ३ लाख ४४ हजार ५०० रुपये इतकी राखीव किंमत निश्चित करण्यात आली आहे. यातून अंदाजे २ हजार ९२८ कोटी रुपयांची रक्कम मिळेल, अशी अपेक्षा आहे. इच्छूक कंपन्यांना १७ जुलैपर्यंत टेंडर भरता येणार आहे.

