Aditya Thackeray : भुयारी मेट्रो बाबतचा 'तो' अहवाल कुणी लपवला?

Aditya Thackeray
Aditya ThackerayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : 17-18 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले त्या भुयारी मेट्रोत पाणी भिंत फुटून बाहेर आले. मेट्रो प्रशासन म्हणते ती तात्पुरती भिंत होती, मग ती काय कोसळायला उभी केली होती असा सवाल करुन मेट्रोच्या टनेलमध्ये 718 तडे गेले आहेत असा रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा अहवाल होता, तरीदेखील मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन कसे केले, अशी विचारणा शिवसेना (उबाठा) युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली.

Aditya Thackeray
Mumbai : 80 कोटींच्या 'त्या' टेंडरला मुंबई महापालिकेची स्थगिती

आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पावसामुळे मुंबई आणि मुंबईकरांचे जे हाल झाले त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला जबाबदार धरले. राज्यात सरकार, प्रशासन, महानगरपालिका आहे की नाही अशी परिस्थिती सोमवारी होती, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी यापूर्वी झालेल्या पावसात अंधेरी सब वे आणि साकीनाक्यात साचलेल्या पाण्याची छायाचित्रेही दाखवली. सोमवारी पावसामुळे नाही तर सरकारच्या अपयशामुळे मुंबई तुंबली, असे टीकास्त्र सोडत आदित्य ठाकरे यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत महायुती सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचून दाखवला. सिंधुदुर्गात शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेपासून मुंबईतील रस्ते घोटाळा, नालेसफाई घोटाळा अशी अनेक उदाहरणे त्यांनी दिली.

Aditya Thackeray
Mumbai : कचरा वाहतुकीसाठी महापालिकेचे टेंडर लवकरच; कचऱ्याच्या वजनानुसारच ठेकेदारांना...

महापालिकेत 92 हजार कोटी मुंबईकरांसाठी वाचवून ठेवले होते ते सरकारने खाली केले. महापालिकेची तिजोरी खाली केली. अडीच लाख कोटीचा डेफिसिट केला गेला. हा पैसा गेला कुठे? याचे उत्तर भाजपने दिले पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईच्या दोन्ही महामार्गावर गटारातून काढलेला गाळ तसाच ठेवला होता. श्रेय घ्यायला सरकार पुढे असते, कर लावायला पुढे असते मग आता दोष उघड झालेत तर मुंबईकरांना भरपाईही द्या, असे आदित्य ठाकरे पुढे म्हणाले. डॉगेस्टोमा या तुर्कीच्या कंपनीने मेट्रोच्या भुयारीकरणाचे काम केले होते. पहलगाम घटनेनंतर तुर्कीच्या सेलेबी कंपनीला एअरपोर्टमधून काढून टाकले मग डॉगेस्टोमाला का काढून टाकले नाही? त्या कंपनीलाही हाकलून द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले. या कंपनीने मुद्दाम देशाला, मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी असे केले नाही ना, असा सवालही त्यांनी केला.

हिंदमाता हा पूर्वी तिथे दीडशे वर्षांपूर्वी तलाव होता. तो बुजवल्यानंतर तिथे वस्ती आली. सखल भाग असल्याने पाणी भरायचे. महाविकास आघाडी सरकार असताना 2021-22 मध्ये सेट झेवियर्स ग्राऊंड आणि प्रमोद महाजन उद्यानात पावसाचे पाणी साठवण्यासाठी टँक बनवले गेले. 300 मि.मी. पाऊस झाला तरी त्याचे पाणी तिथे साठते आणि नंतर ते समुद्रात सोडले जाते. पण सोमवारी तिथे पंप लावलेच नव्हते. पाणी तुंबल्यावर पंप आणले गेले, पण त्यामध्ये डिझेलच नव्हते. मुंबईकरांचे हाल करायचे प्लॅनिंग भाजपने केले होते का? असा संतप्त सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. यावेळी शिवसेना सचिव सुरज चव्हाण, साईनाथ दुर्गे आणि प्रवक्ते आनंद दुबे उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com