
मुंबई (Mumbai) : ८० कोटींच्या शिडी खरेदीच्या टेंडरला मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने स्थगिती दिली आहे. अग्निशमन दलाने यापूर्वी २१ व्या मजल्यापर्यंत जाणारी टर्न टेबल शिडी १० कोटी रुपयांत विकत घेतली होती, तर त्यापेक्षा केवळ ४ मीटर उंच, म्हणजेच २२ व्या मजल्यापर्यंत पोहोचणाऱ्या चार शिड्यांसाठी ८० कोटी खर्च केले जाणार होते. चार मीटरसाठी दुप्पट रकमेत शिडी खरेदीमुळे हे टेंडर चर्चेत आले होते.
मुंबई अग्निशमन दलात ६४ मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर उपलब्ध आहे. त्याशिवाय आपत्कालीन काळामध्ये उंच इमारतीत पोहोचण्यासाठी ७० मीटर, ८१ मीटर आणि ९० मीटर उंच हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म बसवलेल्या वाहने आहेत. तरीही मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने ६८ मीटर उंचीच्या चार शिड्या खरेदी करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली. ६८ मीटर उंचीची शिडी बनवणारी जगभरात मॅग्रियस जीएमबीएच ही एकमेव कंपनी (Monopoly) आहे. याच कंपनीची जगभरात मक्तेदारी आहे. त्यामुळे शिडी खरेदीमध्ये स्पर्धाच झाली नाही. ६८ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या टर्न टेबल लॅडरसाठी (शिडी) २०१७-१८ मध्ये तीन वेळा टेंडर काढण्यात आले. प्रत्येक वेळी मॅग्रियस जीएमबीएचसाठी एकच बोलीदार होता. म्हणून महापालिकेने ६४ मीटर शिडी बनवणाऱ्या कंपनींना टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली. त्यावेळी झालेल्या स्पर्धात्मक प्रक्रियेत १० कोटी रुपयात ६४ मीटर शिडी खरेदी करण्यात आली.
अग्निशमन दलाने नव्याने मागवलेल्या टेंडर प्रक्रियेत थेट ६८ मीटर उंच शिडीसाठी टेंडर मागवले आहेत. त्यामुळे या टेंडर प्रक्रियेत अन्य कोणत्याच कंपनीला भाग घेता आला नाही. त्यामुळे ६८ मीटर शिडी बनवणाऱ्या कंपनीची मक्तेदारी वाढली. त्यामुळे या शिडीची किंमत थेट २० कोटी रुपये पर्यंत नेऊन ठेवली. अवघ्या चार मीटरने शिडीची उंची वाढत असताना महापालिका ६४ मीटर शिडीपेक्षा दुप्पट पैसे मोजणार आहे. हे सी.व्ही.सी. टेंडर धोरण मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करते. तर दुसरीकडे करदात्यांच्या पैशाचा ४० कोटी रुपयांपर्यंत अनावश्यक वापर होऊ घातला आहे. हा खूप गंभीर मुद्दा आहे. म्हणून या प्रकरणाची वैयक्तिकरित्या चौकशी करा, असे पत्र भाजपाचे प्रवक्ता माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांना लिहिले होते.