
मुंबई (Mumbai) : अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. बिकानेर येथे आयोजित या कार्यक्रमामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री श्री.फडणवीस परळ रेल्वे स्थानक येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी कार्यक्रमानंतर संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वंदे भारत रेल्वे, नमो भारत रेल्वे, अमृत भारत रेल्वे अशा रेल्वेच्या माध्यमातून भारतीय रेल्वेचा कायापालट होत आहे. जर्मनीच्या रेल्वे जाळ्यापेक्षा जास्त लांबीचे रेल्वेचे जाळे प्रधानमंत्री मोदी यांच्या मार्गदर्शनात मागील ११ वर्षात उभारले आहे.
विमानतळांच्या धर्तीवर सर्व रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. विमानतळ परिसरात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधा या अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपलब्ध असणार आहेत. मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोड या उपनगरीय स्थानकांसह राज्यातील १५ स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण झाला असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. जगातील आधुनिक रेल्वे प्रणालीमध्ये आता भारतीय रेल्वेचा समावेश होत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 100 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून, त्यापैकी 15 स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. राज्यातील आमगाव, चांदा फोर्ट, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, मूर्तिजापूर जंक्शन, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, सावदा, शहाड तसेच मुंबईतील चिंचपोकळी, परळ, माटुंगा आणि वडाळा रोड ही स्थानके आता लोकोपयोगी आधुनिक सुविधांनी सज्ज झाली आहेत.