
मुंबई (Mumbai) : ‘मुंबई ते नागपूर’ या ७०१ किमीच्या ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’वर ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा’च्या (MSRTC) बसेसना धावण्यास संमती द्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख (Rais Sheikh) यांनी केली आहे. (Mumbai Nagpur Samruddhi Expressway, Devendra Fadnavis, Eknath Shinde News)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’चे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार शेख यांनी पत्राव्दारे मागणी केली आहे. यासदंर्भात बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, ‘समृद्धी’ महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे गुरुवारी उद्घाटन झाले. आता ७०१ किमी ‘समृद्धी’ महामार्ग वाहतुकीस पूर्ण खुला आहे. १० जिल्हे, २६ तालुके, ३९ शहरे आणि ३९२ गावांना जोडणारा हा मार्ग राज्याच्या अर्थव्यस्थेचा महामार्ग होणार आहे. मात्र या महामार्गावरुन ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा’च्या बसेसना धावण्यास परवानगी नाही.
आमदार शेख पुढे म्हणाले की, ‘समृद्धी’ महामार्ग सार्वजनिक निधीतून बनलेला आहे. तो सामान्य नागरिकांना वापरता आला पाहिजे. ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ’ सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे. या बसेसना ‘समृद्धी’वर धावण्यास संमती दिली जात नाही, तोपर्यंत हा मार्ग श्रीमंतांची चैन असणार आहे. मुंबईतील ‘अटल सेतू’ आणि ‘किनारा रस्ता’ यावरसुद्धा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मनाई आहे.
‘समृद्धी’ मार्गावर २६ टोलनाके आहेत. सार्वजनिक व्यवस्था नेहमी तोट्यात असतात. त्यामुळे ‘राज्य परिवहन महामंडळा’च्या बसेसना ‘समृद्धी’वर धावण्यास परवानगी देताना टोलमाफी देण्यात यावी. अन्यथा सामान्यांना हा प्रवास परवडणारा नाही, असा दावा आमदार रईस शेख यांनी केला.