
मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध शहरांमध्ये १८०० हेक्टर जमीन बसस्थानक व बस आगार परिसर स्वरुपात जागा आहेत. यापैकी मोक्याच्या २५० एकर जमिनींचा विकास करून महामंडळ उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करू शकते. टेंडरद्वारे पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) धोरणानुसार अशा जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यात येणार आहे, यामधून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यात यावे, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिल्या.
एस.टी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातील सभागृहात महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस महामंडळाचे महाव्यवस्थापक (स्थापत्य) दिनेश महाजन, वास्तुविषारद लहीवाल आदी उपस्थित होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, ‘एसटी’च्या राज्यातील जागांचा विकास करताना स्थानिक परिस्थिती, व्यावसायिक लाभ आदी बाबी लक्षात घेण्यात याव्यात. या जागांच्या विकासासाठी अ, ब आणि क असे वर्गीकरण करून त्यांचे एक पॅकेज करावे. ज्यामध्ये शहरी, निमशहरी आणि ग्रामीण जागांचा समावेश असावा. पॅकेजमधील मालमत्तेचे मूल्य त्याच पॅकेजमध्ये असावे. राज्यात 72 पॅकेजेसमधून एसटी बसस्थानक, आगार आदींचा विकास करण्यात येणार आहे. पॅकेजमध्ये कामांबाबत सुधारणा करायची असल्यास सुधारणा करून घ्याव्यात. या कामाला गती देवून तातडीने या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देशही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.