
पुणे (Pune): नगर रस्ता ओलांडण्यासाठी विमाननगर चौक आणि चंदननगर परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पादचारी भुयारी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले असले, तरीही अनेक नागरिक त्याचा वापर न करता थेट रस्त्यावरूनच ये-जा करत आहेत. भरधाव वाहतुकीतून अनेक लोक आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत आहेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते.
नगर रस्त्यावर पूर्वी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे लाखो वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे यावर उपाय म्हणून बीआरटी हटविण्यात आली, तसेच ‘सिग्नल फ्री नगर रस्ता’ हा प्रकल्प राबविण्यात आला. त्याअंतर्गत नगर रस्त्यावर जागोजागी यु-टर्न देण्यात आलेले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या पूर्णपणे सुटून वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र, वेग वाढल्यामुळे वाहतुकीतून रस्ता ओलांडणे पादचाऱ्यांना धोक्याचे ठरत आहे.
पादचाऱ्यांसाठी चंदननगर आणि विमाननगर चौकात पादचारी भुयारी मार्ग, तसेच रामवाडी येथे मेट्रोचा पूल रस्ता ओलांडण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र, दोन मिनिटांचा वेळ वाचविण्यासाठी अनेक नागरिक भरधाव वाहतुकीच्या मधून जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडताना दिसतात. काही नागरिक मात्र भुयारी मार्गाचा वापर करतात.
खराडी दर्गा परिसर, आपले घर सोसायटी, पाचवा मैल, टाटा गार्ड रूम आणि खराडी बायपास या सर्व ठिकाणी पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडणे धोक्याचे बनले आहे. येथे सुरक्षा चिन्हे, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग असणे गरजेचे असून, वाहतूक पोलिसही नियुक्त असणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वाहतूक कोंडी होत होती म्हणून आधी लोक बोलायचे. आता वाहनांचा वेग वाढला म्हणून बोलतात. जेथे पादचारी भुयारी मार्ग आहे, त्याचा वापर करायचे सोडून वाहतुकीतून रस्ता ओलांडतात. पादचाऱ्यांनी भुयारी मार्गाचा वापर करायला हवा.
- माऊली भोसले, स्थानिक रहिवासी
भुयारी मार्ग स्वच्छ ठेवावा. म्हणजे नागरिक त्याचा वापर करतील. तसेच, रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल आणि झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नव्याने आखावेत.
- कोमल चव्हाण, स्थानिक नागरिक
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी झेब्रा क्रॉसिंग, सुरक्षा चिन्हे, पादचारी सिग्नल, सूचनाफलक लावण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सोपे होईल.
- संजय धारव, कार्यकारी अभियंता पथविभाग