
मुंबई (Mumbai) : सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे विमानतळ उभारणीबाबतची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र कार्गो व नागरी विमानतळाकरिता विमानतळ विकास प्राधिकरणाने तात्काळ सर्वेक्षण हाती घ्यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे कार्गो विमानतळ व नागरी विमानतळ संदर्भात बैठक झाली. पाटील म्हणाले, कवलापूर येथील ६६.३६ हेक्टर क्षेत्र विमानतळाकरिता उपलब्ध आहे. सांगली जिल्ह्यातील गुंतवणूक व औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी विमानतळ उभारणी महत्त्वाची असून यासाठी प्रलंबित असलेले सर्वेक्षण तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
या प्रकल्पास लागणाऱ्या सर्व प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना पाटील यांनी दिले.
सांगली जिल्ह्यातील प्रस्तावित नागरी विमानतळामुळे उद्योजक, व्यापारी आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक गुंतवणूक, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रालाही नवी चालना मिळेल. विमानतळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योगांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडणे सुलभ होणार असून गुंतवणूक वाढण्यास मदत होईल. तसेच व्यापारी आणि सामान्य प्रवाशांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजीत कदम, आमदार सुहास बाबर, दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी अशोक काकडे, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.