मोदींच्याच हस्ते 'एमटीएचएल'चे लोकार्पण; मुख्यमंत्र्यांकडून तयारीची पाहणी

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

मुंबई (Mumbai) : 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू'ची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज (ता. 06 जानेवारी) सकाळीच पाहणी करण्यात आली. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याची पाहणी करत कोणतेही काम अपूर्ण राहिले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि पालकमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Eknath Shinde
Eknath Shinde : कोकणात लवकरच 20 हजार कोटींचा उद्योग

पंतप्रधानांच्या हस्ते 12 तारखेला या सेतूचे उद्घाटन झाल्यानंतर नागरिकांना प्रवासासाठी हा मार्ग मोकळा करून देण्यात येणार आहे. परंतु, विरोधकांनी या सेतूवरील टोल आकारणीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 22 किमीचा सागरी सेतू असलेल्या या पुलाचे 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या संपूर्ण मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे फक्त मुंबईकरांनाच नाही तर सर्वांनाच मोठा दिलासा मिळणार आहे. अटल सेतू हा गेमचेंजर प्रकल्प आहे. तर, या सेतूमुळे मुंबईकरांसोबतच रायगड आणि नवी मुंबईतील लोकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. हा पूल रायगडमधील चिर्ले येथे संपणार आहे. सध्या या पुलाला पर्यायी असलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी दीड ते दोन तासाचा वेळ रायगडमध्ये पोहोचण्यासाठी लागतो. पण यामुळे आता शिवडीतील व्यक्तीला 20 मिनिटांत रायगडात पोहोचता येणार आहे. त्याशिवाय हा मार्ग पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे आणि मुंबई-गोवा मार्गाला जोडणारा आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे वेळेची तर बचत होईलच, त्याचबरोबर इंधनमध्ये सुद्धा बचत होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडून यावेळी देण्यात आली.

Eknath Shinde
Mumbai : 'एमटीएचएल'वर कारसाठी भरावा लागणार एवढा टोल; मंत्रीमंडळाचा निर्णय

तर विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कोणतेही काम करत नाही. याआधी देखील बरेच प्रकल्प पूर्ण केले, तेव्हा कोणत्या निवडणुका होत्या का? जे अडीच वर्षे काम बंद करून घरात बसले होते, त्यांनी केलेली घाण साफ करण्याचे काम आमचे सरकार करत आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. आता हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पाचे भूमिपूजन हे पंतप्रधानांच्याच हस्ते झाले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यामुळे आता पुन्हा मोदींच्याच हस्ते याचे उद्घाटन होणार असल्याने याचा आम्हाला आनंद आहे. तसेच, 12 तारखेला पंतप्रधान मोदी हे स्वतः या मार्गावरून प्रवास करणार आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पुलाची पाहणी करण्यात आली आहे. पंतप्रधान उद्घाटनाच्या दिवशी पुलाचा ज्या ठिकाणी शेवट होतो, तिथे सभा घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. त्याशिवाय ते मुंबईच्या इतर प्रकल्पांचे देखील उद्घाटन करणार आहेत. एमएमआरडीएच्या प्रकल्पांचे रिमोटच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम मोठा होणार आहे. हा वरळीपर्यंत कनेक्ट करणारा पूल आहे. म्हणून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कोणतेही काम करत नाही. हा प्रकल्प पर्यावरणपूरक आहे. या प्रकल्पामुळे कुठेही फ्लेमिंगो कमी झालेले नाहीत. हा प्रकल्प करताना अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठेही पर्यावरणाला हानी पोहोचली नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे.

Eknath Shinde
Mumbai : 'त्या' 734 इमारतींच्या पुर्नविकासासाठी म्हाडा मिशन मोडवर; लवकरच टेंडर

पंतप्रधान एक वर्षापूर्वी देखील महाराष्ट्रात आले होते. तेव्हा काही निवडणुका होत्या का? विरोधकांना आरोप करण्याशिवाय काही काम आहे का? आम्ही आमचे काम करत आहोत. त्यामुळे त्यांनी काही म्हटले तरी जनता सूज्ञ आहे. डीप क्लिन ड्राईव्हचा मुंबईत परिणाम पाहायला मिळत आहे. त्यांच्यावर देखील विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. आमच्या लोकसभेचा बिगुल हा कामातून वाजला आहे. कामानेच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. आम्ही लोकांना खोटी आश्वासने देत नाही. हे सर्वांनी शासन आपल्या दारीमधून पाहिले आहे. आज अनेक योजना मुख्यमंत्री कार्यालयाकडून राबविण्यात येत आहेत. आम्ही निवडणुका पाहून कोणतेही काम करत नाही. शेतकरी, महिला, मुली या सर्वांसाठी आम्ही काम करत आहोत. हे सरकार फिल्डवर उतरून काम करणारे सरकार आहे, घरात बसून आदेश देणारे हे सरकार नाही, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com